अरुणा ढेरे

नवनीता देव – सेन.. बंगाली साहित्यातलं एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व. कविता हा त्यांचा आत्मीय जिव्हाळ्याचा प्रांत. मात्र, इतरही वाङ्मयप्रकारांत त्यांनी लीलया संचार केल. आयुष्य आणि वैचारिक भूमिका यांच्यातलं उत्कट, गहिरं नातं शेवटपर्यंत जपणाऱ्या लेखिका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा हृदयस्थ परिचय करून देणारा खास लेख..

कुणाकुणाच्या कोण कोण होत्या त्या बंगालमध्ये! कुणाची आत्या, कुणाची मावशी, कुणाची काकू, कुणाची आजी! शुभदीप बंदोपाध्याय नावाच्या कुणा लेखकानं लिहिलंय की, कोणीही वाचक कोलकात्याच्या हिंदुस्थान पार्कमध्ये पूजा पंडालात गेला की त्यांच्या घरी सहज जाऊ शकायचा. छान बुट्टेदार ढाक्याची साडी किंवा जामदानी नेसून त्या बसलेल्या असायच्या. तोंडभरून स्वागत करायच्या. भरपूर गप्पा मारायच्या. ऐंशीच्या घरात असलेल्या, ऑक्सिजन सिलिंडरची सोबत गरजेची झालेली आणि काठीही हातात आलेली. पण चक्क मोटरबाइकवर मागे बसवून कस्तुरी नावाचा तरुण पोरगा त्यांना हिंदुस्थान पार्कात फिरायला घेऊन जायचा. आणि त्या मस्त फिरून आल्या की परत घरी येऊन नाकात ऑक्सिजनची नळी घालून तास- दोन तास गप्प बसून राहायच्या. कस्तुरी त्यांना ‘गुंड पोरगी’ म्हणायचा. आणि खरंच त्या तशाच जगल्या.. आयुष्याशी मस्ती करत. खोडकरपणा त्यांच्या रक्तातच होता आणि तोच त्यांच्या लेखनातही उतरला.

मी त्यांना प्रथम पाहिलं ते साहित्य अकादमीच्या दिल्लीच्या एका कार्यक्रमाच्या वेळी. पाच दिवसांच्या कार्यक्रमांत दुसऱ्या दिवशी त्यांची मुलाखत होती. पहिल्या दिवशी त्या समोर आल्या, अगदी खास वंग महिलेच्या भद्र वेषात. मोठय़ा लाल काठाची बुट्टेदार पांढरी साडी. मोठ्ठं लाल कुंकू. हातात शंखाच्या बांगडय़ा. गळ्यात लाल-काळ्या मोठय़ा मण्यांची माळ. मधे दुर्गेची उठावदार आकृती असलेलं चौकोनी पदक. पहिलीच भेट- तरी हात हातात घेऊन बोलणं. ‘पुण्याला बोलावलंस तर येईन..’ म्हणून तोंडभरून आनंदाचं आश्वासन. साहित्य परिषदेसाठी निमंत्रण दिलंही मी नंतर त्यांना; पण तेव्हा आजारीच होत्या त्या. नाही येऊ शकल्या.

त्यावेळेपर्यंत मी त्यांच्या दोन कथा अनुवादित केल्या होत्या आणि फोनवरच त्यांची संमती घेऊन प्रसिद्धही केल्या होत्या. खरं तर १९९९ मधला साहित्य अकादमी पुरस्कार, २००० मधली पद्मश्री आणि २००५ मधला कमलकुमारी राष्ट्रीय पुरस्कार यांसारखे देशपातळीवरचे मोठे पुरस्कार इतर अनेक पुरस्कारांच्या जोडीनं त्यांना मिळालेले. अनेक मान्यवर राष्ट्रीय समित्यांवर काम केलेलं. साहित्यविषयक कितीतरी उपक्रमांमध्ये महत्त्वाचा सहभाग असलेला. तरीही त्यांच्याजवळ अहंकार आणि गर्व फिरकू नव्हते शकलेले. अगदी खुला, मोकळा, स्वागतशील आणि आनंदी स्वभाव होता त्यांचा. कसदार लेखन आणि उत्तम लोकप्रियता यांचा मेळ तसा दुर्मीळच म्हणायचा. तो होता त्यांच्यात. बंगाली, उडिया, हिंदी, आसामी, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, ग्रीक आणि हिब्रू अशा दहा भाषा त्यांना अवगत होत्या. कविता, कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, ललित गद्य, वैचारिक लेख, प्रवासवर्णन, बालसाहित्य, अनुवाद.. अशा अनेक वाङ्मयप्रकारांमध्ये त्यांचं सातत्यपूर्ण लेखन होतं. ऐंशीच्या आसपास असतील पुस्तकं. विपुल, तरी दर्जेदार! पहिला कवितासंग्रह आला तो ६० वर्षांपूर्वी. ‘प्रथम प्रत्यय’ हे त्याचं नाव. वय वर्षे वीस. कविता रक्तातूनच आली होती. वडील नरेंद्र देव उत्तम कवी होते. फ्रेंच आणि जर्मनबरोबरच फारसीचेही जाणकार होते. वडलांचं भाषाप्रेम आणि भाषेची जाण मुलीमध्येही उतरली होती आणि कविताही. अर्थात केवळ वडलांच्या नव्हे, तर आईच्याही गुणसूत्रांमधून त्यांच्याकडे कविता आली. राधाराणी देवी याही कवयित्री होत्या. ‘अपराजिता देवी’ या नावानं त्या लेखन करायच्या. रवीन्द्रनाथ टागोरांचा सहवास या जोडप्याला लाभला  होता. ‘नवनीता’ हे नाव टागोरांनीच त्यांना दिलं होतं. आणि पुढे ज्यांच्याशी त्यांचं लग्न झालं त्या प्रख्यात अर्थतज्ज्ञ, नोबेलविजेत्या अमर्त्य सेनांनाही त्यांचं ‘अमर्त्य’ हे नावही योगायोगानं रवीन्द्रनाथांनीच दिलं होतं.

कविता हे नवनीतांचं पहिलं प्रेम होतं. जगण्याचा प्रथम प्रत्यय देणारी, निजखूण पटवणारी कविता. इतर कितीतरी वाङ्मय- प्रकारांमधून त्यांनी लेखन केलं. समकालीन सामाजिक- सांस्कृतिक वास्तवाविषयी, परंपरेविषयी, समाजव्यवस्थेतल्या स्त्रीच्या स्थानाविषयी शोधपूर्वक आणि अभ्यासपूर्वक लिहिलं, रामायण-महाभारतातल्या स्त्रियांकडे नव्या जाणिवांनिशी पाहिलं; पण शेवटपर्यंत त्यांच्या मनातळच्या मनातल्या सगळ्याची साक्षी-सोबती होती ती त्यांची कविता. त्यांच्या एकटेपणाला, त्यांच्या प्रेमाच्या तहानेला गळ्यात घेऊन प्रकटणारी कविता! माधवी भट या माझ्या मैत्रिणीनं त्यांच्या काही कवितांचे सुरेख अनुवाद केले आहेत. ते वाचताना त्यांच्या काळजाच्या कंपनांतली कासाविशी कशी सहज कळून येते.

‘थांब ना माझ्याजवळ

भीती वाटतेय्.

सत्य नाहीये हा क्षण, मन सांगतंय्.

मला स्पर्शून रहा-

स्मशानातल्या एकांतात

ज्याप्रमाणे देहाला स्पर्शून असतात स्वजन.

हा हात घे.. हातात घट्ट धरून ठेव

जितका वेळ माझ्याजवळ आहेस,

अस्पर्श ठेवू नकोस.

मला भीती वाटते, हा क्षण सत्य नाहीये

ज्याप्रमाणे असत्य होता दीर्घ भूतकाळ

आणि असत्यच असतो अनंत भविष्यकाळही..’

ही अशी साधी कासाविशीची कविता त्यांनी वयाच्या अर्धशतकाच्या उंबरठय़ावर लिहिली, तेव्हा कविता त्यांच्या सुखदु:खांना जवळ करून सोबत चालत होती. पण पुढे वानप्रस्थाच्या उंबरठय़ाशी त्या कवितेची सोबत प्रश्नचिन्हांच्या वेढय़ात हरवलीशी वाटली तेव्हा हतबल होताना दिसल्या त्या.

‘हे असं तारुण्य सरताना जिवंत राहणं

अशक्य वाटतं फार..

मी तुला हाकारत नाही, तरीही मनातून हे जाणते

की तू घरात आहेस..

मला माहीत आहे करुणामयी,

तू अगदी माझीच आहेस..

तुला सोडून मी कधीची जगतेय कविते,

पण तू मला सोडू नको लगेच.

तुझ्या मनात उपेक्षेसकट राहू दे ना मला

तूच जर सोडून दिलंस

तर मग कोणत्या वानप्रस्थाला जाऊ मी

कविते..?’

कवितेसोबतचा त्यांचा असा एक दीर्घ प्रवास बंगाली रसिकांनी मन:पूर्वक धांडोळला. ‘नवनीता देवसेनेर श्रेष्ठ कविता’ (२००१) असं त्यांच्या निवडक कवितांचं पुस्तक मी प्रियजनासारखं जवळ करत राहिले. ‘या जन्मी जे प्रेम त्यांना लाभलं नाही, ते पुढच्या जन्मात भरभरून लाभो..’ असं लिहीत राहिले.

नवनीतांनी कवितांच्या जोडीनं सातत्यानं गद्यलेखन केलं. त्या अतिशय बुद्धिमान, चाणाक्ष, सजग अशा लेखिका होत्या. अभ्यास आणि संशोधनाच्या बळावर लेखनाची गुणवत्ता त्यांनी वाढवत नेली होती. एक प्रकारे त्यांचं लेखन हा त्यांच्या सक्षमीकरणाचा आलेख आहे असं म्हणायला हरकत नाही.

स्वातंत्र्यपूर्व काळातला त्यांचा जन्म. कोलकात्यासारख्या सुधारणावादी शहरात- साहित्य आणि इतर कलांच्या माहेरघरात, प्रागतिक वातावरणात त्या शिकल्या, वाढल्या. महाराष्ट्रानं अभिमान बाळगावा अशा गोपाळ कृष्ण गोखल्यांच्या नावे सरला राय या त्यांच्या मैत्रिणीनं उभ्या केलेल्या गोखले मेमोरियल स्कूलमध्ये शिकल्या. इंग्रजी विषय घेऊन महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि नंतर जादवपूर विद्यापीठात तौलनिक साहित्याभ्यास या विषयातली एम. ए.ची पदवी त्यांनी प्रथम बॅचची प्रथम विद्यार्थिनी म्हणून मिळवली. दुसरा पदव्युत्तर अभ्यासक्रम त्याच विषयात हार्वर्डमधून त्यांनी विशेष प्रावीण्यासह पूर्ण केला आणि नंतर अमेरिकेतल्या इंडियाना विद्यापीठातून पीएच. डी.ची पदवी मिळवली.

१९५८ साली विशीच्या उंबरठय़ावर लग्न झालं. अमर्त्य सेन या तरुण अर्थशास्त्रज्ञाशी. त्याच्याबरोबरच इंग्लंडला प्रयाण. अंतरा आणि नंदना या दोन मुलींचा जन्म. त्यांना सांभाळत स्वत:चं संशोधन पुरं केलं खरं; पण संसार टिकला नाही. १८ वर्षांचं सहजीवन संपलं. मुलींना घेऊन त्या भारतात परतल्या आणि मग लेखनाच्याच सोबतीनं जगल्या.

तसं तर त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच बदलतं स्त्रीजीवन पाहिलं. भौतिक बदलांशी समाजमानसातला बदल संवादी वेगानं नव्हता, नसतो, हे समजून घेण्याची शहाणीव त्यांच्याकडे होती. त्यामुळे व्यक्तिगत आयुष्यातल्या निर्णयांविषयीच्या जनलोकांच्या तऱ्हतऱ्हेच्या प्रतिक्रिया त्यांनी समंजसपणे, पण कणखरपणे स्वीकारल्या. १९७५-७६ चा काळ स्त्रीवादाच्या उदयाचा काळ होता. तेव्हा घटस्फोट हे परिचयाचं कौटुंबिक वास्तव नव्हतं. एका बाजूला अतीव संवेदनशीलता आणि दुसऱ्या बाजूला धीट बुद्धिमत्ता. नवनीता समजुतीनं जगत आणि लिहीत गेल्या.

वाल्मिकी रामायण हा तर त्यांच्या अभ्यासाचाच विषय होता; पण जोडीला महाभारत आलं, इतिहास, पुराणं आली आणि या कृतींमधून वावरणाऱ्या स्त्रियांचं आधुनिक संदर्भातलं आकलन त्या मांडत गेल्या. कधी त्या आकलनाचे वैचारिक लेख झाले, कधी कविता आणि कधी कथा. आपल्या साहित्यामधून पुरुषसत्तेला त्या खोचक प्रश्न विचारत राहिल्या. विनोद, उपरोध आणि धारदार बुद्धिवाद ही त्यांची हत्यारं होती. त्यांच्यासह त्या स्त्रियांच्या बाजूने लढत राहिल्या. सीतेविषयी त्यांच्या मनात विशेष कोवळीक असावी असं वाटतं. स्त्री म्हणून तिला त्या पुन्हा पुन्हा भेटल्या आहेत. बंगालमधल्या चंद्रावतीचं रामायण आणि दक्षिणेतल्या तेलुगु मोल्लाचं रामायण यांची तुलना कधी त्यांनी केली आहे, तर कधी रावणाच्या बंदिवासात असलेली सीता त्यांच्या कथेचा विषय झाली आहे. आणि कधी सीतेच्या हृदयस्थ एकांताचं मौन त्यांनी कवितेतून मुखर केलं आहे.

माझ्याशिवाय आणखी कोण आहे तुझं?

ती म्हणाली, ‘निळं आकाश!’

आकाशाशिवाय आणखी कोण आहे तुझं?

ती म्हणाली, ‘हिरवी भातशेतं!’

भातशेतांशिवाय आणखी कोण आहे तुझं?

‘ही तांबडी-लाल नदी.’

नदीनंतर?

‘पंचवटी.’

पंचवटीशिवाय?

‘सोनेरी हरीण.’

हरणानंतर?

‘अशोकवन.’

अशोकवनाशिवाय आणखी कोण आहे तुझं?

‘काळी माती.’

काळ्या मातीनंतर?

‘तू आहेस ना..’

त्यांनी स्त्रीच्या हृदयातला खोल आणि सर्जक अंधार पाहिला हलताना, उमलताना, आवेगानं उसळताना. आणि निर्मितीच्या त्या शक्तीचा एक समुचित आविष्कार म्हणून ‘सई’ निर्माण झाली. ‘सई’ ही त्यांची संस्था. बंगालीमधली ‘शोई!’ म्हणजे मैत्रीण. म्हणजे सही. म्हणजे सहिष्णुता. बंगाली लेखिकांचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे ‘सई’! कलांचे आंतरसंबंध जाणत होत्या त्या. म्हणून ‘सई’मध्ये लेखिकांचे हात इतरही बंगाली कलाधर्मी स्त्रियांनी धरले होते. २०१८ मध्ये- म्हणजे गेल्याच वर्षी कोलकात्यात भरलेल्या बोई-मेल्यात म्हणजे पुस्तक मेळ्यात ‘सई’च्या स्टॉलवर पोस्टर होतं- ‘हिंसाचाराच्या विरोधात सृजनशील नारी!’

संहाराला सर्जनाचं उत्तर दिलं पाहिजे, या आग्रहानं स्त्रियांचा एकत्रित आवाज सशक्तपणे उठवू पाहणारी ‘सई’ ही नवनीतांची मानसनिर्मिती. आपल्या पायात प्रियजनांच्या साखळ्याही असू शकतात हे खुल्या मनानं मान्य करत, कधी आईचा, कधी मुलींचा विचार करून सम्यक वाटेनं चालणाऱ्या बंडखोरीत आणि धिटाईतही विवेकी संयमाचा हात न सोडणाऱ्या नवनीता आधुनिक वंग लेखिकांचं नेतृत्व अनुक्तपणे करत राहित्या.

एकदा त्यांनी लिहिलं होतं, ‘एकटी आहे मी. सोबतीला फक्त एक कुत्रा, दोन मांजरी आणि दोन लहान मुली.’ खरं तर एवढे सगळे असल्यावर एकटेपणा कुठला? पण एक दुखरं कडवटपण कदाचित अपुऱ्या संसारानंतर मनातळाशी शिल्लक असेलही; आणि असेलच त्यावर मात करण्याची दुर्दम्य इच्छा! मी अनुवादलेली त्यांची एक कविता आहे-

गप्प राहत राहत एक दिवस फुटतील शब्द!

एक दिवस नदीच्या वळणावर थांबून

वळून उभी राहत, हाक मारून मी म्हणेन,

‘पुरे! आता आणखी नाही.’

सूर्य अस्ताला जाईल किंवा माथ्यावर तळपत राहील,

मी म्हणेन, ‘पुरे! आता आणखी नाही.’

तेव्हा झाडाझुडपांमधून, गवतपात्यांमधून थरथरत

हवा वाहू लागेल.

सगळं कडवटपण, सगळं रुक्षपण

पाऱ्यासारखं जड होऊन गळून जाईल.

वाळू, दगडधोंडय़ांबरोबर खोल गहराईत

तळाचा गाळ बनून जाईल.

वर खेळेल स्वच्छ, शुद्ध प्रवाह आणि

त्यावर झिळमिळणारी सूर्याची हजारो तिरपी किरणं..

शुचितेच्या त्या लाटांवर आपला देह हेलावता सोडून

छोटय़ा बदकांसारखी निश्चिंत

मीही मग तेव्हा त्या आत्मीय पाण्यात उतरेन..

कालप्रवाहात स्त्रीच्या वाटय़ाला असे क्षण येतील? त्यांनी तसं स्वप्न पाहिलं खरं. शेवटी कॅन्सरनं गेल्या त्या. १९३८ च्या जानेवारीत जन्मल्या. २०१९ नोव्हेंबरमध्ये गेल्या.

त्यांच्या कोलकात्यातल्या घराचं नाव होतं.. ‘भालोबाशा.’ भालो म्हणजे सुंदर, छान. आणि बाशा म्हणजे वास. निवास. घर. पण भालोबाशा म्हणजे प्रेम. त्यांच्यावर प्रेम करणारे वाचक आणि रसिक त्यांच्या प्रेमाच्या घरात शेवटपर्यंत ये-जा करत राहिले.

आणि प्रेम?

अमर्त्य सेन म्हणाले, ‘आमची भेट व्हायला पाहिजे होती.’ नाही झाली. आता त्यांच्याजवळ मागे राहिला एक निरुपाय नकार आणि आपल्याजवळ काही निरुपम शब्द!

aruna.dhere@gmail.com