मला जगण्यासाठी काही कारण दिसत नाहीये, तुम्ही मला जगण्यासाठी कारण देऊ शकता का?’’ हा प्रश्न विचारला आहे आपल्या जोडीदाराच्या आग्रहाखातर समुपदेशनाच्या सत्राला नाइलाजानेच हजर राहिलेल्या लेखक विश्वास पेठेंनी आपला समुपदेशक (थेरपिस्ट) कार्ल यांना! जगण्यासारखे आता जीवनात काहीही राहिलेले नाही, या विचाराप्रत लेखक येऊन ठेपलेला आहे. ही त्याची भावना निराशेतून अथवा वैफल्यातून आलेली नसते, तर पक्षाघातामुळे आलेल्या हतबलतेने त्याला असा विचार करण्यास भाग पाडलेले असते.

या स्थितीतून लेखकाला फक्त बाहेर काढण्याचेच नाही तर जीवनावर पुन्हा प्रेम करण्यास प्रवृत्त करण्याचे, जीवनाचा उद्देश शोधण्यास मदत करण्याचे काम एका समुपदेशकाने किती खुबीने केले आहे याचे ‘धावते वर्णन’ आपल्याला ‘गे क्रो’ या विश्वास पेठेंनी लिहिलेल्या पुस्तकात वाचायला मिळते. इंग्रजीतील मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर शाश्वत शेरे यांनी केला आहे. लेखक विश्वास पेठेंनी आपले अनुभव, आपले संपूर्ण जीवनच अत्यंत प्रांजळपणे वाचकांसमोर मांडले आहे.

लेखक विश्वास पेठे हे सध्या अमेरिकेत स्थायिक झालेले सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. ते समलिंगी असून एचआयव्ही बाधित आहेत. एड्स या आजाराबाबत काहीही माहिती आणि औषधोपचार उपलब्ध नसतानाच्या काळात त्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समजले. आपल्या जवळचे समलिंगी मित्र एकामागून एक या आजाराने मृत्युमुखी पडत असताना आयुष्याची तीस वर्षे त्यांनी सातत्याने मृत्यूच्या टांगत्या तलवारीचा सामना केला. अत्यंत बुद्धिमान असलेल्या विश्वास पेठेंकडे तर्कशुद्ध विचार करण्याची आणि ‘आहे ते’ स्वीकारून त्यातूनच काही चांगले घडवण्याची सकारात्मक दृष्टी नेहमीच होती. या क्षमतेचा फायदा त्यांना या संकटांचा सामना करताना कसा झाला, याचे वर्णन त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने केले आहे. स्वत:च्या जीवनाकडे पाहण्याच्या त्यांच्या आनंदी, उत्साही वृत्तीने त्यांना तोवरच्या जीवघेण्या संकटांतून तारले होते. पण आता पक्षाघातामुळे शरीरावरचे नियंत्रणच गमावल्याने आपल्याला परावलंबी जीवन जगावे लागेल, असे वाटून वेळ असतानाच आनंदाने जीवन संपवण्याची निवड करणे त्यांना योग्य वाटू लागले त्याचा हा प्रवास…

या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे समुपदेशनादरम्यान विश्वासने कार्लबरोबर केलेले संभाषणच आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. या संवादातून समुपदेशन प्रक्रियेचा एक उत्कृष्ट आणि प्रभावी वस्तुपाठ आपल्यासमोर उलगडत जातो. कार्लने कोणते प्रश्न विचारले, त्या प्रश्नांमधून काय जाणून घेण्याचा त्याचा हेतू असावा, शेवटी त्याने विश्वासच्या नेमक्या समस्येला कसे शोधले आणि त्याचे निराकरण कसे केले, ही सर्व प्रक्रिया समजून घेणे हा एक उत्कृष्ट बौद्धिक आणि भावनिक अनुभव ठरतो. समुपदेशन खऱ्या अर्थाने कसे असायला हवे, हे सामान्य वाचकाला तर समजतेच; परंतु मानसोपचार क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठी हे पुस्तक आत्मचिंतनासाठीचे कारण ठरते.

पुस्तकातून समजत जाणारी ही प्रक्रिया समुपदेशनाबाबतच्या प्रचलित रूढी, समजाला आव्हान देणारीही ठरते. साधारणत: मानसोपचारतज्ज्ञाने आपल्या क्लायंटला मदत करावी, त्याच्या समस्या सोडवाव्यात किंवा त्याचे मन वळवावे आणि त्याद्वारे त्याचे आयुष्य त्याला समृद्धपणे जगता येईल असे काहीतरी करावे इत्यादी अपेक्षा त्याच्याकडून केल्या जातात. इतक्या साऱ्या गोष्टी पूर्णत: साध्य केल्याचा दावा क्वचितच कोणा मानसोपचारतज्ज्ञाला करता येतो, हे वास्तव आहे. त्याऐवजी सहसंवेदनेची भावना आपल्या क्लायंटपर्यंत पोहोचती करत त्याला आपल्या मनाशी जोडून घेणे आणि काही सूचक प्रश्न विचारत त्याला विचार करायला प्रवृत्त करणे या गोष्टी मानसोपचारतज्ज्ञ नक्कीच करू शकतो. समस्यांनी पिडलेल्या व्यक्तीला रेडिमेड उत्तरांची खरे तर गरज नसते. तसेही रेडिमेड उत्तरे मनाला तर पटतात; परंतु ‘कळते, पण वळत नाही’ या उक्तीप्रमाणे ती आचरणात आणण्यास अवघड जातात. स्वत: विचार करून उत्तरापर्यंत पोहोचता आले तर तो मार्ग मनापासून स्वीकारला जातो आणि त्या मार्गाने वाटचाल सुरू ठेवणे तुलनेने सोपे जाते. क्लायंटला विचारप्रवृत्त करण्यासाठी त्याची समस्या अचूकपणे समजून घेणे आवश्यक ठरते. त्यासाठी त्याला आपले मन उघड करता येईल असे विश्वासाचे नाते त्या दोघांत निर्माण होण्याची गरज असते.

कार्ल विश्वासला आपल्या जीवनाच्या प्रत्येक महत्त्वपूर्ण पैलूंबद्दल बोलण्यास प्रोत्साहित करतो. विश्वासने तोपर्यंतच्या जीवनात संकटांचा सामना करण्यासाठी ज्या क्षमतांचा, दृष्टिकोनाचा आधार घेतला, त्या क्षमतांना त्याच्याच तोंडून वदवून घेत त्याला आपल्या क्षमतांची नव्याने ओळख करून देतो. त्यामुळे आताचेही संकट याच क्षमतांच्या आधारे पार करता येऊ शकते, हा विश्वास त्याला नव्याने जाणवू लागतो. या सर्व गोष्टींमुळे आपल्या अपंगत्वाच्या विचारात सतत गुंतलेले विश्वासचे मन अन्य विचारांमध्ये व्यग्र होत जाते. समुपदेशकाने प्रगल्भतेने ही सारी प्रक्रिया हाताळल्याने तो अनुभव दोघांनाही भावनिक, बौद्धिकरीत्या समृद्ध करणारा ठरतो, हे या उदाहरणाने सिद्ध केले.

‘गे क्रो’, – विश्वास पेठे, अनुवाद- डॉ. शाश्वत शेरे, मनोविकास प्रकाशन, पाने- १४८, किंमत- २५० रुपये.