X
X

मराठी भाषा वाचवायची असेल तर… संगीतकार कौशल इनामदार यांनी सांगितला हा उपाय

READ IN APP

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी संगीतकार कौशल इनामदार यांनी हा उपाय सांगितला आहे

मराठी भाषा दिनानिमित्त संगीतकार कौशल इनामदार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक चांगलं भाष्य केलं आहे. मराठी भाषा वाचवायची असेल तर नेमकं काय करा हे त्यांनी सांगितलं आहे. कौशल इनामदार म्हणतात.. ‘वीज वाचवायची असेल तर तिचा वापर कमी करायला हवा, पण भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा!’ #मराठीराजभाषादिन, #मराठीदिन #म असे हॅशटॅगही त्यांनी ट्विट केले आहेत. हीच पोस्ट त्यांनी फेसबुकवरही शेअर केली आहे.

काय आहे कौशल इनामदार यांची फेसबुक पोस्ट?

#मराठीदिन निमित्त एक मजेशीर गोष्ट. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातील काही मुलं मला भेटायला आली.मला म्हणाली -“सर, झेवियर्स महाविद्यालयात खूप पूर्वीपासून मराठी वाङमय मंडळ आहे परंतु काही कारणाने ते अनेक वर्ष निष्क्रीय होतं. आमचे सर आहेत – शिंदे सर – त्यांनी या मंडळाला पुनुरुज्जिवित करायचं ठरवलं आहे. या मंडळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून आपण यावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही याल का?”

तरूण मुलांशी संवाद साधायला मी कधीही नकार देत नाही. मी त्वरित होकार दिला. तसा त्यातला एक मुलगा जरा ओशाळून म्हणाला – “एकच प्रॉब्लेम आहे सर. मंडळ नवीन आहे आणि तुम्हाला झेवियर्सची कल्पना आहे. आमच्याकडे बराचसा श्रोतृवर्ग अमराठी आहे. तर तुम्ही तुमचं भाषण इंग्रजीतून कराल का?” मला याची गंमत वाटली. कुणी म्हणेल हे कसलं मराठी मंडळ! पण मला यात एक संधी दिसली. मी म्हटलं मी इंग्रजीत हे भाषण करेन. मुलं खूष होऊन परतली.

त्या कार्यक्रमात मी मराठी का बोलली गेली पाहिजे. या विषयावर इंग्रजीतून भाषण केलं. पुण्याचे अनिल गोरे ज्यांना आज महाराष्ट्र शासनाचा भाषासंवर्धन पुरस्कार दिला जाणार आहे, ते एकदा जे म्हणाले होते तेच मी या मुलांना इंग्रजीतून सांगितलं. आपण इंग्रजी बोलतो. उदा. आपण म्हणतो – “Virat Kohli is riding on a wave of popularity.” किंवा “I was surfing channels on my TV.” ही भाषा कुठून आली? तर ही भाषा समुद्रातून आणि नौकायनातून आली आहे. कारण इंग्लंड हा देश पाण्याने वेढलेला आहे. त्यामुळे औरंगाबादला राहणारी मुलगी जेव्हा riding on a wave म्हणते तेव्हा ती second hand अनुभवातून बोलत असते. लाटेवर स्वार होणं म्हणजे काय हे कळायला तो अनुभव स्वतःच्या इंद्रियांनी अनुभवायला हवा! आपली भाषा आपल्या मातीतून उगवते. म्हणूनच हिंदीत – “अफ़वाहों की बाढ़ आती है” आणि मराठीत “अफवांचं पीक येतं”. म्हणूनच मराठीत “पिकतं तिथे विकत नाही” आणि पत्रकार “घोटाळ्याची पाळंमुळं खणून काढतात”. लोक म्हणतात भाषा केवळ एक संवादाचं माध्यम आहे. भाषा संवादाचं माध्यम आहेच पण ‘केवळ’ नव्हे! भाषा संस्कृतीची वाहक आहे.

आपली ओळख म्हणजे काही जन्माचा दाखला नाही. आपली ओळख सनातन आहे. भाषा ही आपल्या ओळखीचं एक परिमाण आहे. म्हणूनच तर ज्ञानेश्वर आपल्या रक्तात आहेत आणि तुकाराम आपल्या नेणिवेत. मराठी भाषेमुळेच शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला होणारी जाणीव ही इतरांना होणाऱ्या जाणिवेपेक्षा काहीतरी वेगळी आहे. भाषा आपल्या पर्यावरणाशी असलेलं आपलं नातं आहे जे आपल्याला जमीनीशी, वास्तवाशी जोडून ठेवतं. आणि म्हणून जिथे आपण राहतो तिथली भाषा आपल्याला येणं इष्ट असतं.

मला ठाऊक नाही की माझ्या बोलण्याचा किती परिणाम झाला पण दोन वर्षांपूर्वी मला झेवियर्स महाविद्यालयात पुन्हा बोलावलं. या वेळी संपूर्ण कार्यक्रम तर मराठीत झालाच पण मीही माझं भाषण पूर्णपणे मराठीत केलं. पुन्हा एकदा माझं आवडतं वाक्य म्हणतो आणि थांबतो.

वीज वाचवायची तर तिचा वापर कमी करायला हवा, पण भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा!

आपल्या भाषणाचं उदाहरण देऊन कौशल इनामदार यांनी मराठी भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा असं म्हटलं आहे.

21

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on: February 27, 2020 2:34 pm
Just Now!
X