धवल कुलकर्णी

कान्हा व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध बाराशिंगा हरीण पाहण्यासाठी आता मध्यप्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पाही भेट देता येईल. कारण रविवारी कान्हातली १३ बाराशिंगा हरणे सातपुडा व्याघ्रप्रकल्पात नेण्यात आली. यामध्ये दोन नर आणि ११ माद्यांचा समावेश आहे.

या ऑपरेशनमध्ये कान्हा व्याघ्र प्रकल्प आणि सातपुडा व्याघ्रप्रकल्पातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग होता. या प्राण्यांना एका विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या ट्रकमधून दुसरीकडे हलविण्यात आले.

याआधीही ३३ बाराशिंगा हरणांना कान्हामधून सातपुडा व्याघ्र प्रकल्पात नेण्यात आले आहे. यासाठी मध्यप्रदेश सरकार आणि केंद्र सरकारची परवानगी घेण्यात आली होती.

बाराशिंगा, ज्याला इंग्रजीमध्ये स्वंप डियर सुद्धा म्हणतात, भारतामध्ये फार कमी ठिकाणी आढळतो. त्यामध्ये कान्हा आणि आसाम आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणांचा समावेश होतो. बाराशिंगा ही एक धोक्यात आलेली प्रजाती आहे. त्यामुळे त्यांची लोकसंख्या इतर ठिकाणी विखुरली जाणं प्रचंड गरजेचेही आहे. कारण समजा त्यांच्या मूळ अधिवासामध्ये कुठलंही अस्मानी-सुलतानी संकट आलं उदाहरणार्थ  एखादं आजारपण वगैरे तर ही प्रजाती संपूर्णपणे नष्ट होणार नाही. एखाद्या प्राण्याची प्रजाती कुठल्याही  मर्यादित भागात राहिले तर त्यांचे आपापसात प्रजनन होऊन येणाऱ्या पिढ्या या कमकुवत होऊ शकतात.

एकेकाळी भारतात फार मोठ्या प्रमाणात आढळणारा हा प्राणी शिकार आणि अन्य कारणांमुळे हळूहळू घटत गेला. १९७० च्या दशकामध्ये बारशिंगे जवळजवळ नष्ट झाले होते आणि जंगलातल्या अधिवासामध्ये त्यांची संख्या फक्त सहासष्टच्या आसपास होती परंतु सरकार आणि मध्यप्रदेश या वनखात्याने घेतलेल्या प्रयत्नांमळे त्यांची संख्या आज सहाशेच्या आसपास आहे.

यापूर्वीसुद्धा आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून मानस राष्ट्रीय उद्यानामध्ये बाराशिंगा यांना हलवण्यात आले होते. एक नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की भारतामध्ये सिंह हे फक्त गुजरात मधील गिर येथे आढळतात. परंतु गुजरातमधील सिंहांना अन्य राज्यांमध्ये पाठवण्यासाठी गुजरात सरकार तयार होत नाही. भारत हा एकमेव देश आहे जिथे वाघ आणि सिंह आढळतात.