निराधार योजनेंतर्गत पगारी बंद केल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी २०० निराधार महिलांनी आंदोलन केले. तहसील कार्यालय असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन तहसीलदार ज्योती पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरूकेली. इमारतीवर चढून महिला आंदोलन करीत असल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांची धांदल उडाली. शिवसंग्राम संघटनेने आरक्षणासाठी मोर्चा काढला. अंबाजोगाई व माजलगावमध्ये निकृष्ट कामाविरोधात नगरपालिकेला कुलूप ठोकण्यात आले. केजमध्ये अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी वीज कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. विविध आंदोलनांमुळे बीडसाठी सोमवार आंदोलन वार ठरला.
बीड तालुका तहसीलदार पवार यांनी मागील काही दिवसांपासून विविध योजनांतर्गत निराधारांच्या पगारी बंद केल्यामुळे दिलीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. निवेदने, मोर्चा काढल्यानंतरही तहसीलदार बधत नसल्यामुळे सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास जवळपास २०० महिला नगर रस्त्यावरील तहसील कार्यालयाकडे घोषणा देत आल्या. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर तहसील कार्यालय आहे. मात्र, महिला थेट इमारतीचे तीन मजले चढून गच्चीवर पोहोचल्या आणि घोषणाबाजी सुरूकेली. या घोषणाबाजीकडे सर्वाचेच लक्ष वेधले गेले आणि अधिकाऱ्यांची धांदल उडाली. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलांची समजूत काढून त्यांना इमारतीवरून खाली आणले.
‘शिवसंग्राम’चा गाढव मोर्चा
शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गाढव मोर्चा काढण्यात आला. २१ जूनला आश्वासन देऊनही सरकारने आरक्षण जाहीर केले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमा लटकवून गाढवांना रस्त्याने मिरवण्यात आले. माजलगाव शहरात नगरपालिका मूलभूत सुविधा देण्यास असमर्थ ठरल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी पालिकेला कुलूप ठोकले. अंबाजोगाईत साठे चौक ते आंबेडकर चौक दरम्यान रस्ता व नालीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे या भागातील संतप्त महिलांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकले. या वेळी डॉ. द्वारकादास लोहिया, संजना आपेट, छाया वाघचौरे, लता बडे आदी उपस्थित होते.
आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून केंद्र सरकारच्या नियमानुसार वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी केली. माजलगाव तालुक्यातील िदद्रुड येथील महाराष्ट्र बँकेची शाखा पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांनी बँकेला कुलूप ठोकले.
तरकेज येथे थकीत वीजबिलासाठी वीज कंपनी कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्यामुळे राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य बजरंग सोनवणे यांनी अभियंता चंद्रशेखर सूर्यवंशी यांना जाब विचारला. यातून वाद झाल्यानंतर सोनवणे यांनी मारहाण केल्याची तक्रार सूर्यवंशी यांनी दाखल केली. या प्रकरणी कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jun 2014 रोजी प्रकाशित
तहसीलदारांविरोधात २०० महिलांची इमारतीच्या छतावर धडक
निराधार योजनेंतर्गत पगारी बंद केल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी २०० निराधार महिलांनी आंदोलन केले. तहसील कार्यालय असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन तहसीलदार ज्योती पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरूकेली.
First published on: 24-06-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 200 womens on building against tehsildar