लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहिल्यानगर : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत येथून ७५० यात्रेकरूंना घेऊन जाणारी जिल्ह्यातील पहिली रेल्वे आज, रविवारी अयोध्येकडे रवाना झाली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

महापालिका आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे, प्रभारी रेल्वे स्थानक व्यवस्थापक एस. जी. महाजन, आयआरसीटीसीचे विभागीय व्यवस्थापक गजराज सोन्नार, समाजकल्याण निरीक्षक संदीप फुंदे आदी उपस्थित होते.

यात्रेकरूंसमवेत रेल्वेत २० स्वयंसेवक व १३ जणांचे वैद्यकीय पथक आहे. अयोध्येला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर दाखल झालेल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचे प्रशासनाच्यावतीने उपरणे, माळ घालून स्वागत केले व यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील १४ तालुक्यातून निघालेल्या यात्रेकरूंची त्यांच्या गावपासून ते रेल्वे स्थानकापर्यंत बसमधून आणण्याची व्यवस्था प्रशासनाने केली होती. यात्रेकरूंना नाष्ट्याची सोयही स्थानकावर केली होती. रेल्वेतही आरोग्य व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

स्वप्नांची पूर्तता

रेल्वे डब्यांमध्ये बसल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. आमच्यासारख्या वृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी अयोध्या दर्शन हे स्वप्नच होते. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमुळे आमच्या स्वप्नांची पूर्तता होत आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या उपक्रमामुळे अनेक भाविकांना अयोध्येला जाण्याची संधी मिळाल्याने महिला आणि ज्येष्ठांनी या उपक्रमाबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 750 pilgrims from ahilyanagar leave for ayodhya under the chief ministers pilgrimage scheme mrj