पंढरीत दोन वर्षांनंतर भरणाऱ्या वारीचे प्रशासनापुढे आव्हान

पंढरीची वारी गेली दोन वर्षे करोनामुळे भाविकांना येता आले नाही. यंदा १५ लाख भाविक पंढरीत येतील, असा अंदाज प्रशासनाचा आहे.

mh pandharpur
पंढरीत दोन वर्षांनंतर भरणाऱ्या वारीचे प्रशासनापुढे आव्हान

मंदार लोहोकरे

पंढरपूर :  पंढरीची वारी गेली दोन वर्षे करोनामुळे भाविकांना येता आले नाही. यंदा १५ लाख भाविक पंढरीत येतील, असा अंदाज प्रशासनाचा आहे. मात्र पंढरपूर शहरात दर्शन रांगेतील घुसखोरी, नदी पात्रात पुरेसे पाणी, गर्दीचे नियंत्रण, शहरातील वाहनतळ व्यवस्था, स्वच्छता आदी बाबत प्रशासनापुढे आव्हान उभे ठाकले आहे. गेली दोन महिने प्रशासनाने नियोजन केले  असले तरी कागदावरील  नियोजन प्रत्यक्षात कसे येईल याचा अंदाज येत नाही. दुसरीकडे लाखो भाविक पायी वारी आणि सावळय़ा विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे, वारीची शेकडो वर्षांची परंपर आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत करोनामुळे मोजक्याच भाविकांना पंढरीच्या वारीला येता आले. शेकडो वर्षांच्या परंपरेला करोनामुळे खंड पडला.

 आषाढी वारी म्हणजे सर्व संतांच्या दिंडय़ा पायी चालत ठरलेल्या दिवशी पालखी निघणार, ठरलेल्या ठिकाणी मुक्काम असा शिस्तबद्ध सोहळा असतो. त्यामुळे ज्या ठिकाणाहून पालखी पंढरीकडे जाते त्या ठिकाणी सर्व व्यवस्था प्रशासन करते. या सर्व पायी भाविकांबरोबरच पंढरीत एस,टी.बस, रेल्वे, खासगी वाहन यातूनदेखील भाविक प्रामुख्याने एकादशीच्या आधी तीन ते चार दिवस पंढरीत येतात. त्यामुळे पंढरपुरातील प्रशासन सर्व सोयीसाठी तयार असते. वारीला येणारा भाविक जसे विठ्ठलाचे दर्शन घेतो. तसे चंद्रभागेत स्नानदेखील करतो. यापूर्वी चंद्रभागा नदीत उजनी धरणातून एकादशीच्या आधी दोन दिवस पाणी सोडले जाते. सोलापूर जिल्ह्यात पालख्या दाखल झाल्यावर नदी पात्रात पाणी सोडले तर मुबलक पाणी पात्रात राहील या बाबत आता अंमलबजावणी व्हावी. तसेच गर्दी नियंत्रणासाठी काही घाटावर एकरी मार्ग करावेत. शहरातील वाहनतळाचे ठिकाण याची माहिती शहरात येणाऱ्या मार्गावर असावीत. तसेच दर्शन रांगेतील घुसखोरी रोखण्यासाठी मंदिर प्रशासनाचे नियोजन असते. मात्र घुसखोरी रोखण्यात अपयशी राहिली आहे. यासाठी दर्शन रांग एकाच छताखाली आले तर ही समस्या दूर होईल. शहरातील गर्दीच्या दिवशी स्वच्छतेचे नियोजन केले पाहिजे. यांसारखी आव्हाने प्रशासनापुढे आहे. प्रशासनाने गेली दोन महिने तयारी केली आहे. हे कागदावरचे नियोजन प्रत्यक्षात उतरावे अशी मागणी होत आहे.

यंदाच्या वारीला पालखी मार्गावर महिला भाविकांना स्वतंत्र शौचालय, मातृत्व कक्ष, आरोग्य सेवा पुरविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर पालखी मार्गावरील विहिरीचे पुनर्भरण, र्निजतुकीकरण केले जाणर आहे. दुचाकी वाहनावर आरोग्य दूत नेमले आहेत. येणाऱ्या भाविकांनी स्वत:च्या आरोग्यासाठी मुखपट्टीचा वापर करावा.

– दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी

‘आषाढ’ ही सामान्य यात्रा नसून तो महाकुंभासारखा वारकऱ्यांचा मोठा उत्सव आहे. वर्षभर वारकरी या उत्सवाची वाट पहात असतो. मात्र महाराष्ट्र सरकार व प्रशासन नावाच्या व्यवस्थेला एक अतिरिक्त जबाबदारीह्ण या पलीकडे कोणताही विशेष उत्साह दिसून येत नाही. आषाढी यात्रेसाठी मंत्रिमंडळाची एक विशेष बैठक पंढरपूरमध्ये आयोजित केली जावी अशी मागणी गेली अनेक वर्षे आम्ही करत आहोत, ती मागणी तर सोडाच. परंतु आहे त्या यात्रा नियोजन बैठका केवळ फार्स म्हणून घेतलेल्या दिसून येत असल्याने वारकरी संप्रदायात तीव्र नाराजी आहे.

–  ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, वारकरी संप्रदाय पाईक संघ

आषाढी एकादशीच्या यात्रेला चंद्रभागा नदीच्या तीरावरील (६५ एकर) भक्ती सागरमध्ये मोठय़ा संख्येने वारकरी मुक्काम करतात तिथे व्यापारी मंडळी़ंना जागा उपलब्ध करून दिली तर वारकऱ्यांना चांगली सोय उपलब्ध होईल, त्याचबरोबर परगांवहून येणारे छोटे व्यावसायिक, फेरीवाले, हातगाडी वाले, पथारी वाले, यांच्या साठी प्रशिक्षणा मार्गाच्या बाहेर हॉकर्स झोन निर्माण केले तर वारकरी बांधवांना त्रास होणार नाही.

 –  सत्यविजय मोहोळकर, अध्यक्ष, व्यापारी महासंघ

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A challenge administration wari filling up after two years pandharpur ysh

Next Story
परभणीत पक्षद्रोहाची परंपरा खंडित; राजकीय पडझडीत शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी