सत्तेतील भागीदार असणाऱ्या शिवसेनेला खूष ठेवण्यासाठी मुंबईतील नाईटलाईफला तत्वत: परवानगी देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता या मुद्यावरून त्यांच्याच परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधाला तोंड द्यावे लागणार आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेला राज्यभरात विरोध करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याने फडणवीसांना हा विरोध मोडून काढून शिवसेनेच्या पसंतीचा निर्णय घ्यावा लागणार आहे.
युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांच्या मागणीवरून मुंबईतील बार, डिस्को व पब रात्रभर सुरू ठेवण्यास मुंबई पोलिसांनी मान्यता दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतचा प्रस्ताव विधिमंडळाकडे पाठविला आहे. एकीकडे शिवसेनेची मर्जी सांभाळत असताना फडणवीस यांना संघ परिवारातीलच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. मुंबईतील बार, डिस्को व पबसारखी ठिकाणे सुरू रात्रभर सुरू ठेवण्यास परिषदेने तीव्र विरोध केला आहे. आज अमरावती येथे झालेल्या परिषदेच्या विदर्भ प्रांत कार्यकारिणीत या विरोधात प्रस्ताव संमत करून निदर्शनेही करण्यात आली. राज्य सरकारने अशा प्रकारची परवानगी दिल्यास सांस्कृतिक नुकसान होणार असून केवळ व्यापारी वर्गाला आकर्षित करण्यासाठी सेना अशी मागणी करीत आहे. सेनेचे राजकारण संपले असून केवळ आर्थिक वर्चस्वासाठी अशा मागण्या रेटल्या जात आहेत. राज्य सरकारने नाईटलाईफ संदर्भात कोणतीही परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारा ठराव परिषदेच्या विदर्भ प्रांत कार्यकारिणीत करण्यात आला.
केवळ श्रीमंतांना हव्या असलेल्या सुखसोयी देण्यासाठी रेटल्या जाणाऱ्या अशा मागण्यांना राज्यभर विरोध करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. ‘श्रीमंतांचे चोचले पुरविण्यासाठी अशा मागण्या केल्या जातात. कोणत्याच सामान्य माणसाला मध्यरात्रीनंतर मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्याची इच्छा नसते. अगोदरच महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची संख्या कमी पडत आहे. त्यात अशा प्रकारे बार, पब व डिस्को यांना मध्यरात्रीनंतरही सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहेत. आज विदर्भात या विरोधातील निदर्शनांना प्रारंभ झाला असून राज्यभर याचा विरोध केला जाईल, असे अभाविपचे पश्चिम क्षेत्र सहसंघटनमंत्री सुरेंद्र नाईक यांनी सांगितले. भाजपचे सरकार असले तरीही या मुद्यावरून तीव्र विरोध केला जाईल. सरकार कोणतेही असो चुकीच्या निर्णयांना अभाविप विरोध करेलच, असेही नाईक म्हणाले.