विधानसभा निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून विविध राजकीय पक्षांमधील इच्छुकांचा भारतीय जनता पक्षाकडे मोठा ओढा असला, तरी जिल्हय़ातील अशा नेत्यांचा प्रवेश थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याच आदेशाने लांबल्याचे समजते. नजीकच्याच काळात होणाऱ्या त्यांच्या राज्य दौऱ्यात किंवा त्यांनी हिरवा कंदील दिल्याशिवाय हे प्रवेश होणार नाहीत असे सांगण्यात येते.
राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा परिषदेचे सदस्य तथा कुकडी कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप (दोघेही श्रीगोंदे), राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर) या प्रमुखांसह विविध पक्षांमधील नेते, पदाधिकारी भाजपत प्रवेश करण्यासाठी रांग लावून आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी सोमवारीच शहराच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यांचा हा दौरा निश्चित झाला, त्याच वेळी या इच्छुकांचे भाजपत प्रवेश होतील, असे सांगण्यात येत होते. तसे तर झालेच नाही, मात्र गडकरी यांच्या दौऱ्यात कोणाचेच पक्षप्रवेश होणार नाहीत, ही बाबही दोनतीन दिवसांपूर्वीच स्पष्ट झाली होती. मात्र हे प्रवेश का लांबले, याचा खुलासा होत नव्हता. ‘मी आल्यावर पाहू’ असा निरोपच त्यांनी राज्यातील नेत्यांना धाडल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार थेट अमित शहा यांनीच यात हस्तक्षेप केल्याचे समजते. नजीकच्या काळात ते स्वत: राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. तोपर्यंत कोणाचेही पक्षप्रवेश करू नये, असा आदेशच त्यांनी दिल्याचे समजते. त्यामुळेच अशा अनेक इच्छुकांचे भाजपमधील प्रवेश लांबले आहेत. जिल्हय़ात नेवासे, शेवगाव-पाथर्डी व श्रीगोंद्यात भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पाचपुते यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला असला तरी पुढची दिशा अद्यापि स्पष्ट केलेली नाही. त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे, मात्र दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष रिंगणात उतरण्याचीही शक्यता व्यक्त होते. समर्थकांचा त्यांना तसा आग्रही आहे. माजी आमदार नेवासे मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. या सगळय़ांचे लक्ष आता अमित शहा यांचा दौरा व त्यांच्याच पुढील आदेशाकडे लागले आहे.
पाचपुते यांचा पुढचा राजकीय प्रवास निश्चित नसला तरी भाजपमधील खासदार दिलीप गांधी यांच्या गटाने मात्र त्यांना भाजपमध्ये घेण्यास जोरदार विरोध सुरू केला आहे. त्यासाठी मोठे लॉबिंग सुरू आहे. गडकरी यांच्या दौऱ्यात ही बाब प्रकर्षांने पुढे आली. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे झालेल्या कार्यक्रमात त्याचीच प्रचिती आली. येथे प्रामुख्याने नगर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचाच मोठा समावेश होता. बहुसंख्य वक्त्यांनी येथे बोलताना श्रीगोंद्यातील हालचालींवरच भर देताना पाचपुते यांना पक्षात प्रवेश देऊ नये अशीच भूमिका मांडली. विशेष म्हणजे कर्जत-जामखेडमधील कार्यकर्तेही त्यात आघाडीवर होते, हा या लॉबिंगचाच एक भाग मानला जातो.