उत्सवांमध्ये नियमांची काटेकोर अंमलबजावणी

सार्वजनिक उत्सवांसंदर्भात, सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्याबाबत येत्या १५ दिवसांत महापालिका व जिल्हय़ातील पालिका धोरण जाहीर करणार आहे. त्याचबरोबर ध्वनिक्षेपकासंदर्भात पोलीस प्रशासन शांतता क्षेत्रे घोषित करणार आहे.

सार्वजनिक उत्सवांसंदर्भात, सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्याबाबत येत्या १५ दिवसांत महापालिका व जिल्हय़ातील पालिका धोरण जाहीर करणार आहे. त्याचबरोबर ध्वनिक्षेपकासंदर्भात पोलीस प्रशासन शांतता क्षेत्रे घोषित करणार आहे. ही अंमलबजावणी व नियमांचा भंग होतो आहे का, याची पाहणी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी तहसीलदारांची पथके नियुक्त केली जाणार आहेत. भंग झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अनिल कवडे व जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी आज दिला.
सार्वजनिक उत्सवासंदर्भात उच्च न्यायालय व राज्य सरकारने दिलेल्या आदेशाची माहिती देण्यासाठी नियोजन भवनमध्ये कवडे यांच्या उपस्थितीत शांतता समितीची सभा झाली. त्यानंतर कवडे यांनी ही माहिती दिली. मनपाचे प्रभारी आयुक्त विलास वालगुडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, आरपीआयचे अशोक गायकवाड, काँग्रेसचे उबेद शेख, अजय बोरा तसेच अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
सार्वजनिक उत्सवात ‘डीजे’चा वापर बंद करण्याची सूचना कवडे व त्रिपाठी यांनी केली. उच्च न्यायालयाच्या अटी, नियमांची माहिती प्रसिद्ध करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार तसेच विविध प्रकारच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यासही कवडे यांनी मान्यता दिली. नियमांची अंमलबजावणी होते, की नाही याची तपासणी तहसीलदारांचे पथक उत्सवापूर्वी सात दिवस अगोदर करणार आहे. याबाबत ते मनपाला अहवाल सादर करतील. त्यानुसार मनपा व पालिका कारवाई करणार आहे.
वाहतुकीला अडथळे होतील असे मंडप रस्त्यात उभारल्यास कारवाई केली जाईल, असे त्रिपाठी यांनी स्पष्ट केले. उत्सव साजरा करताना त्याचा त्रास नागरिकांना होणार नाही, याची काळजी घ्यावी. विशेषत: तरुण मंडळांनी ही माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा. आगामी गणेशोत्सवात मंडळांनी स्वयंस्फूर्तीने यासंदर्भात निर्णय घ्यावा, असेही आवाहन कवडे यांनी केले
नगरमध्ये ३२ शांतता क्षेत्रे
नगर शहरात सध्या ३२ शांतता क्षेत्रे जाहीर करण्यात आली आहेत. पोलिसांच्या मदतीने त्याचा आढावा घेऊन त्यात गरजेनुसार सुधारणा करण्यात येईल, असे वालगुडे यांनी या बैठकीत सांगितले. ध्वनिप्रदूषणाच्या दृष्टीने या क्षेत्रात विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Accurate implementation of rules in festivals

Next Story
‘कृत्रिम पावसासाठी तातडीने स्फोटक वापर परवाना द्यावा’
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी