‘अंधार खूप झाला’, ‘नाती जपून ठेवा’ असा संदेश देणाऱ्या येथील ‘सप्रेम परिवार’च्या वतीने ‘व्हॅलेंटाइन डे’चे औचित्य साधत गुरुवारी रात्री साडेआठ वाजता प. सा. नाटय़मंदिरात ‘ऐ मेरी जोहराजबीं’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याच्या धावपळीच्या काळात कुटुंबव्यवस्थेला असंख्य हादरे बसताहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एकमेकांमधील संवाद जसा वाढला तसा सुसंवाद आकसला गेला. आपुलकीचे दोन शब्द महागल्याने वृद्धाश्रमांची संख्या वाढली, घटस्फोटाचे प्रमाण वाढले. या पाश्र्वभूमीवर नातेबंध सुदृढ होण्यासाठी सप्रेम परिवारच्या वतीने आजवर विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये स्त्री-भ्रूणहत्येला विरोध करत त्याविषयी प्रबोधन करण्यासाठी ‘माझी मुलगी’ कार्यक्रमाची निर्मिती झाली. यानंतर ‘प्रेम स्वरूप आई’च्या माध्यमातून आईविषयी ऋण व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न झाला. आईची महती गाताना डोळ्याच्या कडाही पाणवू न देणारा, आपल्या पिलांच्या सुखासाठी झटणाऱ्या वडिलांसाठी ‘बाप.. एक आकाश’च्या माध्यमातून वडिलांना साद घालण्यात आली. या तिन्ही कार्यक्रमांना लाभलेला प्रतिसाद पाहता व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधत पती-पत्नीच्या नात्यातील विविध पैलू समोर आणण्याचा प्रयत्न ‘ए, मेरी जोहराजबीं..’च्या माध्यमातून होत आहे. या मैफलीत रागिणी कामतीकर, मीना निकम, अनिरुद्ध कुर्तडीकर, भूषण कापडणे हे गायक सहभागी असून त्यांना अमोल पाळेकर, अनिल धुमाळ, राजेश्री धुमाळ संगीतसाथ करणार आहेत. शब्दसुरांची पाखरण करणाऱ्या या मैफलीला उस्मान पटणी यांच्या शेरो-शायरीने चार चाँद लागतील. कार्यक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी सतीश बोरा (९३७३९००४२५) यांच्याशी संपर्क साधावा. या मैफलीचा आस्वाद रसिकांनी मोठय़ा प्रमाणावर घ्यावा, असे आवाहन सप्रेम परिवारच्या वतीने करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aee meri joharajabee programe in nashik by saprem family