औंढा नागनाथ तालुक्यातील गारपिटीच्या यादीत नावे वगळल्याचा वाद आता मुद्यावरून गुद्यावर आला आहे. त्याची परिणती तलाठी व कृषी सहायक यांच्यात एकमेकांचा दोष दाखविण्यावरून हाणामारी होण्यात घडली.
जिल्ह्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने प्राप्त अहवालानुसार शेतक ऱ्यांना मदतीसाठी प्रशासनाकडे निधी दिला. निधीवाटपाचे काम सुरू झाल्यानंतर गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारीचे प्रमाण जिल्हाभर वाढत गेले. तलाठी व कृषी सहायकांनी ‘आर्थिक’ व्यवहारातून नुकसानीचे पंचनामे केल्याचा आरोप करून ठिकठिकाणी चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत गेली. काही गावांतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. त्यामुळे गारपिटीच्या निधीवाटपाचा मुद्दा जिल्हाभर गाजला. मागील आठवडय़ात उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर आले असताना गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना निधी मिळाला नाही व पंचनामे आर्थिक व्यवहारातून झाल्याच्या तक्रारी केल्या. पवार यांनी जिल्हा प्रशासनाला प्राप्त तक्रारीवरून गारपीटग्रस्तांच्या नुकसानीची फेरतपासणी करण्याच्या सूचना केल्या. या मुद्दय़ाबरोबरच औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा येथील शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून कृषी सहायक चव्हाण व तलाठी सोमटकर यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली.
सोमवारी दुपारी पोटा येथील काही शेतकरी पीकविम्यासाठी तलाठी कार्यालयात आले होते. या वेळी तलाठी सोमटकर यांनी शेतकऱ्यांना कृषी सहायकाच्या सह्य़ा आवश्यक असल्याचे सांगितले. यावरून एका शेतकऱ्याने कृषी सहायक चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यामुळे चव्हाण तलाठी कार्यालयात पोहोचले असता तलाठी व कृषी सहायक समोरासमोर आले. या वेळी दोघांमध्ये गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीतील नावांच्या मुद्यावरून शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. यावरच हा वाद न थांबता दोघांत थेट हाणामारी सुरू झाली. कार्यालयात बसलेल्या शेतकऱ्यांनी हस्तक्षेप करून हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील कोणीच माघार घेत नसल्याने शेतकऱ्यांनीच कार्यालयातून काढता पाय घेतला. हा प्रकार समजल्यावर गावांतील इतर ग्रामस्थ जमले. त्यांनीच दोघांचे भांडण सोडविले. कृषी सहायक व तलाठय़ातील हाणामारीच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा कृषिविम्याचा प्रश्न पुन्हा रखडला गेला.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jul 2014 रोजी प्रकाशित
गारपिटीचा वाद मुद्यावरून गुद्यावर!
औंढा नागनाथ तालुक्यातील गारपिटीच्या यादीत नावे वगळल्याचा वाद आता मुद्यावरून गुद्यावर आला आहे. त्याची परिणती तलाठी व कृषी सहायक यांच्यात एकमेकांचा दोष दाखविण्यावरून हाणामारी होण्यात घडली.
First published on: 30-07-2014 at 01:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agriculture assistant talathi fighting