अहिल्यानगर : माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या उद्या, रविवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेवर पुरोगामी मंडळाने बहिष्कार घातला आहे; तसेच शिक्षक सभासदांनीही सभेस उपस्थित राहू नये, असे आवाहन केले आहे.

पुरोगामी मंडळाचे अध्यक्ष उत्तम खुळे, कार्याध्यक्ष काकासाहेब घुले, सचिव जाकीर सय्यद आदींनी ही माहिती दिली. या वेळी पुरोगामी मंडळाचे पदाधिकारी सुभाष चासकर, वाल्मीक बोठे, बाळासाहेब पिंपळे, सूर्यभान सुद्रिक, दशरथ कोपनर, कैलास साठे, दिलीप देवकर, कैलास राहणे, अशोक वारुळे, संतोष तावरे आदी उपस्थित होते.

या संदर्भात माहिती देताना खुळे व घुले यांनी सांगितले, की संचालक मंडळाने शिफारस केली असली, तरी सर्वसाधारण सभा सर्वोच्च असल्याने सभासदांना त्यामध्ये वाढ सुचवता येते. गेले महिनाभर सभासदांनी वाढ सुचवूनही संचालक मंडळाने शिफारस केलेली नाही. सभेस उपस्थित राहूनही लाभांश वाढवून मिळणार नसल्याने पुरोगामी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उद्या होणाऱ्या सभेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

अपेक्षित नफा होऊनही मागील संचालकांना दोष देता यावा म्हणून विद्यमान संचालकांनी मुद्दामहून उत्पन्नातून अवास्तव, जास्तीच्या तरतुदी करून निवळ नफा कमी राहील याकडे लक्ष दिले. त्याचबरोबर कर्जाची मर्यादा न वाढवणे, कर्जाचा व्याजदर कमी न करणे, निवृत्तांच्या कृतज्ञता निधीची वर्गणी वाढवूनही यापुढे वाढ रोखणे, निवडून आल्यानंतर लगेचच विनानिविदा खरेदी करणे, संचालक मंडळाची सभा संस्थेच्या सभागृहात न घेता मंगल कार्यालयात घेणे, वचननाम्यावरून सभासदांची दिशाभूल झाल्याने सभेत त्यांचेच कार्यकर्ते जाब विचारणार आहेत.

जिल्ह्यात सर्वांत जास्त लाभांश देण्याची परंपरा असलेल्या या संस्थेत प्रथमच प्राथमिक शिक्षक बँकेपेक्षाही लाभांश कमी मिळाला. तीन महिन्यांतच सत्ताधाऱ्यांकडून भविष्यात कर्जावरील व्याजदरवाढीचेही संकेत मिळत आहेत. सत्ताधाऱ्यांची मनमानी व आडमुठ्या धोरणामुळे सभेमध्ये गोंधळ झाल्यास त्याचा दोष पुरोगामी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर येऊ नये, म्हणून आम्ही बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहोत.