वैष्णव पंथीयांच्या प्रमुख ऋषींचा संदर्भ, आकर्षक खांब, खास महाराष्ट्रीय पध्दतीच्या दीपमाळा, त्यासाठी वापरलेला दगड, ग्रेनाईटचा कल्पकतेने वापर.. ही वैशिष्ठय़े आहेत साधू-महंतांसाठी साकारलेल्या साधूग्रामच्या भव्यदिव्य प्रवेशद्वाराची ! वैष्णव आखाडय़ांचे प्रमुख महंत ग्यानदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक वास्तुरचनाकार अमृता पवार यांनी प्रवेशद्वाराची रचना केली आहे.
येथील वैष्णवपंथीय आखाडय़ांच्या ध्वजारोहणाबरोबर साधूग्राममध्ये उभारलेल्या जगतगुरू रामानंदचार्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. अतिशय कमी कालावधीत उभे राहिलेले साधुग्रामचे भव्य प्रवेशद्वार या महोत्सवाचे प्रतिनिधीत्व करत आहे. या प्रवेशद्वारासाठी पाच ते सहा वास्तुविशारदांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यात पवार यांच्या सराहा कन्सटन्सीच्या रचनेची निवड झाली.
ही रचना तयार करण्यासाठी महंत ग्यानदास आणि महंत सुधीरदास यांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरले. या प्रवेशद्वाराच्या उभारणीसाठी वापरलेल्या साहित्यामुळे त्याचे आर्युमान किमान १०० वर्ष राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले. महाराष्ट्रीय दगडात कारागिरांनी हाताने दीपमाळा कोरल्या. जवळपास १६० कारागिर सलग ४० दिवस त्यासाठी झटत होते. तातडीने काम पूर्ण करावयाचे असल्याने ग्रेनाईटला ‘लेदर’ची किनार देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Architect amrita pawar create entry gate for saint