राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात काल रात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत, नागरिकांना मारहाण करत ऐवज लुटला. दरोडेखोरांनी किमान पाच ठिकाणी लूट केली. शस्त्रांनी वार झाल्याने दोघे जखमी झाले. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी पंचनामा न केल्याने नेमकी किती रकमेची लूट झाली हे स्पष्ट झाले नाही. काही ठिकाणी दरोडेखोर व नागरिक यांच्यात झटापटही झाली. दरोडेखोरांना धाक दाखवण्यासाठी जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य सुभाष पाटील यांनी हवेत गोळीबार केला.
मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेतीनपर्यंत दरोडेखोर धुमाकूळ घालत होते. दरोडेखोर किमान ४ ते ५ च्या संख्येने होते, त्यांनी कापडाने चेहरे झाकून घेतलेले होते. त्यांच्याकडे दोन तलवारीही होत्या. अनीस शेख व धनसिंग गुरखा हे दोघे मारहाणीत जखमी झाले. पत्रकार ज्ञानेश दुधाडे यांच्याकडेही दरोडेखोरांनी लूट केली.
टोळीने प्रथम शेख रहेमान यांच्या घराकडे मोर्चा नेला, घराबाहेर झोपलेल्या त्यांना मारहाण करत ते घरात घुसले. अनीस शेख यांच्यावर वार केले. त्यांच्या सुनेच्या अंगावरील दागिने ओरबडले. सादिक शेख यांनी झटापट केल्याने टोळी तेथून पसार झाली. ही टोळी नंतर पत्रकार दुधाडे यांच्या घराकडे गेली, बाहेर झोपलेले त्यांचे वडील बाळाजी यांच्या खिशातील रोख रक्कम व आई सुमनबाई यांचे मंगळसूत्र पळवले. दरोडेखोर नदीच्या दिशेने पळाले. आरडाओरडय़ाने नागरिक जागे झाले. त्यांनी पाठलाग सुरू केला. त्यामुळे पाटील यांनी हवेत गोळीबार केला.
टोळीने नंतर धनासिंग गुरखा याच्याकडील रोख रक्कम मारहाण करत पळवली. राजेंद्र पोटे यांच्या घराचा दरवाजा तोडून मारहाण केली व रक्कम पळवली. गावक-यांनी शोधमोहीम सुरू केली होती, परंतु दरोडेखोर पसार झाले. पहाटे साडेतीनपर्यंत हा धुमाकूळ सुरू होता. नागरिकांनी राहुरी पोलिसांना कळवले, मात्र पोलीस थेट दुपारी दाखल झाले. सायंकाळपर्यंत पंचनामा झालेला नव्हता.