नक्षल चळवळीने हात झटकले; पोलीस मात्र दाव्यावर ठाम
सध्या गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात असलेले दिल्लीचे हेम मिश्रा व प्रशांत सांगलीकर आणि अन्य तीन स्थानिक आदिवासी तरुणांचा नक्षल चळवळीशी कसलाही संबंध नाही, असे नक्षलवाद्यांनी पत्रकाद्वारा जाहीर केले आहे. या प्रकरणात नक्षलवाद्यांनी हात झटकले असले तरी या दोघा दिल्लीकरांजवळ सापडलेली कागदपत्रे चळवळीशी घनिष्ट संबंध असल्याचे दर्शवणारी आहेत, असा दावा पोलिसांनी केला आहे.
गेल्या २३ ऑगस्टला गडचिरोली पोलिसांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या हेम मिश्रा या तरूणाला बल्लारपूर रेल्वे स्थानकावर अटक केली होती. त्याला अबुजमाडच्या जंगलात घेऊन जाण्यासाठी आलेल्या पांडू पोरा नरोटी व महेश करमचंद तिरकी या दोन आदिवासी तरुणांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हेम मिश्रा हा जहाल नक्षलवादी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मिश्राने दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी गोंदिया जिल्हय़ातील देवरी येथे प्रशांत सांगलीकर उर्फ राहीला अटक केली. त्याला जंगलात घेऊन जाण्यासाठी आलेल्या छत्तीसगडमधील विजय तिरकी या तरूणालासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सध्या हे सर्वजण पोलीस कोठडीत आहेत. यापैकी मिश्रा व सांगलीकरकडे सापडलेल्या कागदपत्रावरून हे दोघेही जहाल नक्षलवादी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या दोघांच्या अटकेमुळे नेहमी नक्षलवाद्यांची बाजू घेणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या वर्तुळात मोठे वादळ उठले असून, या कार्यकर्त्यांनी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून पोलिसांच्या कारवाईचा निषेध करणे सुरू केले आहे.
या पाश्र्वभूमीवर आता नक्षलवाद्यांनी सुद्धा एक पत्रक काढून पोलिसांनी अटक केलेल्या या सर्वाशी चळवळीचा कोणताही संबंध नाही असे म्हणत हात झटकले आहेत. नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोली विभाग समितीचा प्रवक्ता श्रीनिवासने हे पत्रक जारी केले आहे.
या प्रकरणात नक्षलवाद्यांनी हात झटकले असले तरी हेम मिश्राला आणण्यासाठी गेलेल्या दोन स्थानिक आदिवासी तरूणांच्या वडिलांनी मात्र वेगळीच माहिती दिली आहे. पोरा नरोटी व करमचंद तिरकी या दोघांनी दोन दिवसापूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांची मुले निर्दोष असल्याचा दावा केला. त्याचवेळी या दोघांनी नक्षलवाद्यांनी या मुलांना केवळ हेम मिश्राला आणण्यासाठी पाठवले होते, असेही या दोघांनी कबूल केले. बंदुकीच्या धाकावर नक्षलवाद्यांनी सांगितलेले काम केले म्हणून आमची मुले नक्षलवादी कशी ठरतात, असा सवाल या दोघांनी उपस्थित केला आहे. नरोटी व तिरकी यांच्या या वक्तव्यामुळे नक्षलवाद्यांचे खोटेपण उघड झाले आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या अटकेत असलेले दोन आदिवासी तरुण नक्षलवादी नाहीत याची कल्पना आम्हाला आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मिश्रा व सांगलीकर मात्र कडवे नक्षलवादी असून त्यांच्याजवळून मिळालेली कागदपत्रे सर्व काही स्पष्ट करणारी आहेत असा पोलिसांचा दावा आहे.