आमदार रणजित कांबळे यांच्यावर ठोस कारवाई करण्याचे आश्वाासन मिळाल्यानंतर डॉक्टर व आरोग्य कर्मचारी संघटनांनी काम बंद आंदोलन मागे घेतले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले तसेच देवळी तालूका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण धमाणे यांना आमदार रणजित कांबळे यांनी शिवीगाळ केल्याने आरोग्य वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर कांबळे यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला. मात्र ही कारवाई जुजबी असून त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी संघटना व जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेने केली होती. कारवाई न झाल्यास आजपासून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
आरोग्य अधिकाऱ्यास धमकावल्याप्रकरणी आमदार रणजित कांबळेंवर गुन्हा दाखल!
कोविडच्या पार्श्वभूमीवर असे आंदोलन आरोग्य सेवा विस्कळीत करणारे ठरू शकत असल्याने, जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेत संघटनांशी समन्वय साधला. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी बुधवारी रात्री दोन तास संघटना प्रतिनिधींशी चर्चा केली.
“रणजित कांबळेंनी अनेक अधिकाऱ्यांना धमक्या दिल्यात, त्यांना त्वरीत अटक करा”
यावेळी, डॉ. स्वप्नील बेले, डॉ. अमोल येळणे, डॉ. माधुरी दिघेकर तसेच कर्मचारी संघटनेचे नेते दिलीप उटाणे, सिध्दार्थ तेलतुंबडे, संजय डफरे व अन्य पदाधिकाऱ्यांनी या चर्चेत कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच यापूढे असे प्रकरण घडणार नाही, याची हमी मागितली. ती प्रशासनाने मान्य केल्यानंतर विविध संघटनांनी कामबंद आंदोलन तुर्तास स्थगित केल्याचा निर्णय प्रशासनाला कळविला. व्यक्तीगत रागलोभापेक्षा नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्ना असल्याने आम्ही सामोपचाराची भूमिका घेतली, अशी प्रतिक्रिया दिलीप उटाणे यांनी दिली.