नीरज राऊत

कोरोना विषाणूच्या भीतीपोटी नागरिकांनी कोंबडीचे मांस खाण्याचे मोठ्या प्रमाणात कमी केल्याने कुक्कूटपालन व्यवसायावर व परिणामी हॅचरी व्यावसायिकांवर मोठे संकट उद्भवले आहे. यंदाच्या होळीच्या हंगामामध्ये चिकनला उठाव नसल्याने जिल्ह्यातील एका हॅचरी मालकाने नऊ लाख उबलेली अंडी तसेच पावणेदोन लाख नवजात कोंबड्यांच्या पिल्लांना नाईलाजाने जमिनीत नष्ट करणे भाग पडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर जिल्ह्यात डॉ. सुरेश भाटलेकर यांच्या दोन हॅचरी व ३५ पोल्ट्री उद्योग असून सद्यस्थितीत त्यांपैकी दहा शेडमध्ये सुमारे ९० हजार कोंबड्या विक्रीसाठी तयार अवस्थेमध्ये आहेत. त्यांना बाजारामधून आवश्यक प्रमाणात उठाव नसून कोंबडीच्या पिलांपासून ४० दिवसांत सुमारे दोन किलोची कोंबडी तयार होते त्यासाठी ७५ रुपयांचा खर्च होतो. मात्र, कोरोना विषाणूच्या भीतीपोटी मांसाहार करण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच होळीच्या निमित्ताने होणारी खरेदी अपेक्षित प्रमाणात झाली नसल्याने या कुक्कुटपालन व्यवसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील या हॅचरी कुक्कुटपालन व्यवसायिकांनी तीनशे टन इतके चिकन शीतगृहामध्ये ठेवले आहे. त्यासाठी लागणारे ब्लास्ट फ्रिजर व कूलर याकरिता भाडे असे किमान १० ते १५ रुपये प्रतिकिलो अतिरिक्त खर्च या व्यवसायिकांना उचलावा लागत आहे.

एकीकडे चिकनला उठाव नसताना नव्याने पिल्ले तयार होणारी सुमारे नऊ लाख अंडी डहाणूच्या एका हॅचरी मालकाने खड्ड्यामध्ये गाडली. त्याचप्रमाणे डबघाईला आलेल्या कुक्कुटपालन व्यवसायात नव्याने निर्माण केलेल्या सुमारे पावणेदोन लाख कोंबडीच्या पिल्लांना खाद्य देण्यासाठी पैसे नसल्याने अशा नवजात कोंबड्यांना देखील खड्ड्यात पुरण्याची नामुष्की ओढावली आहे.

या व्यवसायाला आगामी काळात मर्यादीत प्रतिसाद लाभणार या शक्यतेपोटी हॅचरी कर्मचारी निम्म्यावर आणला असून नोकरीनिमित्ताने मराठवाडा व इतर ठिकाणाहून आलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे. त्याचप्रमाणे कुक्कुटपालन क्षेत्रात खाद्य म्हणून लागणाऱ्या मक्याची मागणी कमी झाली असून त्याच्या दरांमध्ये देखील सुमारे सहा रुपये प्रति किलो अशी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. सध्या घाऊक बाजारपेठेत जिल्ह्यात १२ ते १४ रुपये प्रतिकिलो इतक्या दराने कोंबडीच्या पिलांची विक्री होत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या तसेच हॅचरी उद्योगासमोर संकट उभे राहिले आहे.

अंडी आणि कोंबड्या नष्ट करण्यास नाईलाज

कोंबडीच्या मांसाला कोरोना विषाणूच्या भीतीपोटी बाजारामध्ये उठाव नाही. सध्या मोठ्या प्रमाणात कोंबड्या उपलब्ध असल्याने तसेच यापुढे पक्षांना मर्यादित मागणी लक्षात घेऊन नाईलाजाने उबविलेली अंडी व नवजात कोंबड्याचे पक्षी यांची विल्हेवाट लावणी भाग पडत असल्याचे डहाणूतील कुक्कुटपालन व्यावसायिक डॉ. सुरेश भाटलेकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Backdrop of corona virus nine lakh eggs and one and a half lakh chickens destroyed aau