पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या अन्यायाविरोधात ४० वर्षांपेक्षा जास्त काळ लढा दिलेल्या बापू बिरू वाटेगावकर यांचे आज निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पायावर सांधे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सुरूवातीच्या काळात दरोडे घालण्यासाठी ते पश्चिम महाराष्ट्रात ते कुप्रसिद्ध होते. तसेच पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचेही त्यांचे किस्से प्रसिद्ध आहेत. मात्र ते सातत्याने गरीबांना मदत करत होते. मुलींवर, महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात पेटून उठत होते. दरोडे आणि हत्यांप्रकरणी त्यांना शिक्षाही झाली होती. यानंतर मात्र   त्यांनी दरोडे घालणे सोडले आणि समाज कार्याला वाहून घेतले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बापू बिरू वाटेगावकर सुमारे २० ते २५ वर्षे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. २५ वर्षे सह्याद्रीच्या डोंगर रांगामंध्ये राहून त्यांनी गरीबांना मदत केली. मात्र  केलेल्या गुन्ह्यांसाठी नंतर त्यांनी शिक्षाही भोगली. बापू बिरू वाटेगावकर यांच्या नावाने लोक चळाचळा कापत असत. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. गरीबांविषयी बापूंना विलक्षण कळवळा होता. वाळवा तालुक्यातील बोरगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. या गावातील रंगा शिंदे हा गोर-गरीबांना त्रास देत असे. गावातील स्त्रियांची छेड काढत असे. त्या बापू बिरू वाटेगावकरांनी संपवले. रंगाच्या भावानेही असाच उच्छाद मांडला होता तेव्हा त्याचाही खून त्यांनी केला. त्यांच्या आयुष्यावर सिनेमा निघाला. यामध्ये बापू बिरू वाटेगावकर यांची भूमिका अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी साकारली होती.

गरीबांना न्याय मिळवून देताना बापू बिरूंच्या हातून १२ खून झाले. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले पण ते हाती आले नाहीत. मग पोलिसांनी वाटेगावकरांच्या कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केली. गरीबांनी मला कायम आधार दिला असे बापू वाटेगावकर नेहेमी सांगायचे. एखाद्या माणसाच्या मुलीला लग्नानंतर सासरची मंडळी छळत असतील तर तो हतबल होत असे. त्याला मग कोणी सांगितले की बापूंकडे जा की तो येत असे. मग मी त्या मुलीच्या सासरी जाऊन सासरच्या मंडळींना भेटायचो असे. ज्यानंतर ती मंडळी सुतासारखी सरळ व्हायची असे किस्से अनेकदा बापूंनी सांगितले आहेत. आता याच गरीबांना मदत करणाऱ्या माणसाची प्राणज्योत मालवली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bapu biru wategaonkar passed away in sangli