करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण टाळेबंदी तथा संचारबंदीचा अंमल असतानाही सोलापूरजवळ चोरटय़ांनी विदेशी दारूचा साठा असलेले गोदाम फोडून दोन लाख ३४ हजार रूपये किमतीचा विदेशी दारूचा साठा लंपास केला. ही चोरी सराईत चोरटय़ांनी केली की गेल्या दीड महिन्यात दारू न मिळाल्याने संयमाचा बांध तुटलेल्या मद्यपी मंडळींनी हे कृत्य केले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

सोलापूरपासून दहा किलोमीटर अंतरावर भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे ब्रूक डिस्ट्रिब्युटर्स प्रा. लि. कंपनीचे गोदाम आहे. या गोदामाच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा चोरटय़ांनी तोडून आत प्रवेश केला. संचारबंदीच्या काळात परिसर निर्मनुष्य असताना चोरटय़ांनी हे गोदाम फोडत चोरटय़ांनी विदेशी दारूचा साठा लंपास केला.

संचारबंदी काळात दारूची दुकाने फोडण्याचे सोलापुरात पाच प्रकार घडले आहेत. मात्र एका घटनेचा उलगडा पोलिसांनी केला असता दारू दुकानाच्या व्यवस्थापकानेच दारूचा साठा हडप करून चोरीचा बनाव केल्याचे उजेडात आले होते.