दूरसंचार क्षेत्रात शासकीय सेवा म्हणून अग्रेसर असलेल्या बीएसएनएलच्या विविध सेवांना ग्राहकांची मागणी आहे. जिल्ह्य़ात अनेक दिवसांपासून ही सेवा विस्कळीत झाल्याने बीएसएनएलचे हजारो ग्राहक त्रस्त झाले आहेत.
दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएलच्या सेवेसोबत अनेक खाजगी कंपन्याही स्पध्रेमध्ये आपले स्थान टिक वून आहेत. या खाजगी कंपन्याही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना राबवत आहेत. मोबाईल येण्यापूर्वी दूरध्वनी सेवा फक्त बीएसएनएलची असल्याने या कंपनीकडे प्रारंभी मोठा ग्राहक वर्ग जोडला गेला. बीएसएनएल शासनाची कंपनी असल्याने ग्राहकांची ओढ या कंपनीकडे जास्त होती. वाशीम जिल्ह्यातही इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या जास्त आहे.
आजच्या आधुनिक युगात मोबाईल व इंटरनेट या सेवा अत्यावश्यक असल्याने या क्षेत्रात सुध्दा विविध कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. मात्र, बीएसएनएलच्या तुलनेत इतर कंपन्या चांगली सेवा देत असल्याने बीएसएनएलचे ग्राहक दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक गावात अजूनही बीएसएनएलच्या मोबाईल सेवेचे कव्हरेज व्यवस्थित मिळत नाही. त्याचप्रमाणे इंटरनेटची सेवा सुध्दा विस्कळीत होत आहे. इंटरनेटची गती सुध्दा इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी असल्याने इंटरनेट सेवा वारंवार बंद पडत आहे. लॅन्डलाईन सेवा अनेक वेळा खंडीत होत असल्याने बीएसएनएलचे ग्राहक त्रस्त झाल्याचे दिसत आहे.
या संदर्भात ग्राहकांनी बीएसएनएलच्या कार्यालयात तक्रार केल्यानंतरही त्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन जिल्ह्यातील विस्कळीत झालेली बीएसएनएलची सेवा सुरळीत करून ग्राहकांचा त्रास कमी करावा, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.