अहिल्यानगर: शहरातील बाजार समिती परिसरातील एका मिठाई व सुकामेवा विक्रीच्या दुकानातून खरेदी केलेल्या डिंक लाडूत काचेचा तुकडा आढळला. लाडू खरेदी करून खाणाऱ्या तरुणाच्या तोंडाला या काचेच्या तुकड्यामुळे गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार दुकान मालक आणि चालक या दोघांविरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कोतवाली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहराच्या माळीवाडा भागातील रहिवासी प्रणव प्रकाश पाडळे (वय २३) यांनी शनिवारी दुपारी बाजार समितीच्या आवारातील एका मिठाई व सुकामेवा विक्रीच्या दुकानातून १०० रुपयांचे डिंक लाडू विकत घेतले होते. घरी आल्यानंतर लाडू खात असताना त्यांना तोंडात काहीतरी टोचल्यासारखे जाणवले. त्याने लाडू बाहेर काढून पाहिला असता त्यात काचेचा तुकडा असल्याचे आढळले. त्याच्या तोंडातून रक्तस्राव सुरू झाला होता. यानंतर प्रणव पाडळे यांनी मित्र प्रितम कदम आणि प्रकाश विधाते यांच्यासोबत दुकान गाठले. चालक व मालक या दोघांना घडलेला प्रकार सांगितला. रक्ताने माखलेला रुमाल दाखवूनही चालक व मालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने प्रणव यांनी जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेतले.
या घटनेनंतर प्रणव पांगळे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) लेखी तक्रार केली. एफडीएने कारवाई करत दुकानाचा परवाना ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीसाठी निलंबित केला होता. मात्र, दुकान मालकाने या आदेशाचे उल्लंघन करून दुकान सुरूच ठेवल्याचे प्रणव पाडळे यांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे त्यांनी दुकान चालक व मालक यांचा निष्काळजीपणा तसेच प्रशासकीय आदेशाचा भंग केल्यामुळे प्रणव पाडळे यांनी काल, शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत दुकान मालक व चालकांविरोधात फिर्याद दिली.