गेले १० दिवस लातूर जिल्हा व परिसरातील विविध उपक्रमांमधून पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर सहभागी झाले. नेहमीचा गंभीरपणा सोडत वैचारिक दिशा देण्याबरोबरच ‘तुम्ही ठरवले तर परिस्थितीवर मात करता येऊ शकते,’ असा वडीलकीचा सल्लाही त्यांनी दिला.
पंजाबचे राज्यपाल म्हणून शिवराज पाटलांनी काम सुरू केल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्याप्रमाणे चाकूरकरांना पुन्हा सक्रिय राजकारणात घेतले जाईल, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा होती. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर ही अपेक्षा आणखीच वाढीला लागली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी तरुणांना संधी देण्यावर भर दिल्यामुळे, तसेच चाकूरकरांना वाढत्या वयामुळे पुन्हा सक्रिय राजकारणात प्रवेश मिळाला नाही. प्रारंभापासूनच आपल्या इच्छेसाठी चाकूरकरांनी कधी कोणाला गळ घातली नाही. नियतीनेच त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यास सुरुवात केली. मिळालेल्या जबाबदारीचे सोने करण्यात ते यशस्वी झाले. लोकसभेची आठ वेळा निवडणूक लढवली. सलग सात वेळा विजय मिळविल्यानंतर आठव्या वेळी त्यांना पराभव पत्कारावा लागला. त्यांचे नशीब बलवत्तर की त्यानंतरही ते थेट गृहमंत्री झाले. ‘२६/११’च्या हल्ल्यानंतर त्यांना गृहमंत्रिपद गमवावे लागले. मात्र, पुन्हा पंजाबचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. राज्यपाल पदावर काही काळ काम केल्यानंतर पुन्हा त्यांना सक्रिय राजकारणात प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती आता मावळली असल्याचे चित्र दिसते आहे. गेल्या दहा दिवसांत दररोज किमान एका ठिकाणी जाहीर कार्यक्रमात ते बोलले. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या भाषणाला लोकांनी गर्दी केली. एरवी चाकूरकर म्हणजे ब्रह्मांड, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान याच्या खाली उतरत नाहीत, अशी टीका करणारी मंडळीही मनापासून त्यांचे विचार ऐकत होती व अतिशय दूरदृष्टीचा नेता असल्याची टिप्पणी करीत होती. म् अनेकांनी चाकूरकरांचा आधार घेऊन भविष्यात राजकीय वजन वाढेल, यासाठी त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. चाकूरकरांना हे कळत नाही, असे कोणी समजू नये. ज्याला जे करायचे ते करू द्या, आपण सर्वाचे आहोत, या प्रतिमेला त्यांनी तडा जाऊ दिला नाही. त्यांच्या देवघरावर भाजपा, शिवसेना, मनसे, भाकपा, माकपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्वच पक्षांची मंडळी विविध कारणांनी भेटण्यास येत होती.  साईबाबा शुगर्सचे राजेश्वर बुके यांनी ५.७५ मेगाव्ॉट क्षमतेचा राज्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला. चाकूरकरांचे वैचारिक नेतृत्व मान्य करणारी मंडळी कर्तृत्वात खुजी आहेत, अशी भावना लोकांमध्ये पसरत होती. बुकेंनी आपल्या कर्तृत्वाने ही भावना पुसून काढण्यात मोठे पाऊल टाकल्यामुळे जिल्ह्यातील लोकांत चांगल्या चर्चेला सुरुवात झाली आहे.