अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आसारामबापू यांना अनावृत पत्र पाठवून मंत्रांच्या सहाय्याने पाऊस पाडण्याचे आव्हान देण्यात आले आहे. मंत्रशक्तीने पाऊस पाडण्याचा आणि हवेची दिशा बदलण्याचा दावा आसारामबापूंनी गुरुवारी दूरचित्रवाहिन्यांवर केला होता. त्यांचे हे कथन आश्चर्यजनक असून विज्ञानाला आव्हान दिल्यासारखे आहे.
नैसर्गिक प्रक्रिया बदलण्याविषयीचे भाकित करणे स्वत:ला स्वयंभू समजण्यासारखे आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे राज्यातील दुष्काळाला तोंड देत आहेत. शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीवर चिंतीत आहेत. त्यांनीच आसारामबापू यांच्या होलिकोत्सव कार्यक्रमाला पाणी न देण्याची घोषणा केली. त्यामुळेच देवपुरुष मानून राज्याच्या दुष्काळग्रस्त भागात पाऊस पाडण्यासाठी निमंत्रित केले जावे, अशी आसारामबापू यांची इच्छा असावी, अशी खिल्ली समितीने पत्रात उडवली आहे. मुख्यमंत्री काय विचार करतात, हा मुद्दाच नसून जनहितासाठी शक्तीचे प्रदर्शन करून शेतकऱ्यांची दुष्काळातून सुटका केली पाहिजे, असा सल्लाही समितीने आसारामबापूंना दिला आहे.  समितीने कोणताही चमत्कार सिद्ध करणाऱ्याला १५ लाख रुपये देण्याचे कबूल केले आहे, मात्र समितीच्या १५ लाख रुपयांची फारशी गरज आसारामबापू यांना नसून त्यांनी केवळ शेतकऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करावे. मंत्रांनी पाऊस पडणार असेल तर सरकार त्यांच्या उपक्रमाला सर्वतोपरी मदत करायला सहज तयार होईल. मंत्रांच्या सामर्थ्यांमुळे लोकांना पुरापासूनही वाचवता येईल. ज्या शक्तीचा आसारामबापू दावा करीत आहेत ती शक्ती भूकंपापासूनही संरक्षण करू शकेल, अशी अपेक्षा समितीने प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केली आहे. युद्धाच्या वेळी क्षेपणास्त्रांची दिशा बदलण्यास उपयोगी ठरेल. त्सुनामी आणि सागरी तुफानांच्या वेळी त्यांनी अशी सूचना दिली असती तर पुढील हानी टाळता येऊ शकली असती. या सर्व आपत्तीच्या वेळी आसारामबापू संकटमोचन असल्याचे सिद्ध झाले असते, असे पत्र आसारामबापू यांना पाठवण्यात आले आहे. या पत्राला आसारामबापू यांनी उत्तर द्यावे अथवा न द्यावे, पण जनहितासाठी दुष्काळग्रस्त भागात मंत्रांच्या शक्तीचे प्रदर्शन जरूर करावे, असे आवाहन समितीचे सरचिटणीस उमेश चौबे यांनी केले आहे.