महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आजही बालविवाह केले जातात. उमलत्या वयात मुलींच्या हाती संसाराची दोरी देऊन त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. पण महाराष्ट्रातील एका उपक्रमामुळे आणि वर्गमित्रांच्या सजगतेमुळे १२ बालविवाह रोखण्यास मदत झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे घडलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यानंतर मे महिन्यात सर्वांचे निकाल जाहीर झाले. विद्यार्थ्यांची प्रगती नोंदवणारं प्रगती पुस्तक प्रत्येकाच्या हातात आलं. यावेळी या प्रगती पुस्तकावर चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आले होते. बालविवाहसारख्या प्रथा रोखण्यासाठी सरकार पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजनेचा भाग म्हणून प्रगती पुस्तकावर चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहेत. याच हेल्पलाईन क्रमांकाला फोन करून तब्बल १२ बालविवाह रोखण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलींचे बालविवाह होत होते, त्या मुलींच्या वर्गमैत्रिणींनी आणि वर्गमित्रांनीच चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून हे बालविवाह रोखले. १०९८ आणि ११२ हे चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक आहेत. या क्रमांकावर फोन केल्यास पीडित आणि घटनेची माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाते.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला लग्नाचा मुहूर्त होता. या मुहूर्तावर आणि यापुढील दिवसांच्या मुहूर्तांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये १२ बालविवाह संपन्न होणार होते. १० मे रोजी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर काही फोन आले. या फोनवरून संबंधित मुलीची माहिती, नाव आणि पत्ता देण्यात आला. या माहितीच्या आधारे पोलीस आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी हे बालविवाह तातडीने रोखले.

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणात बालविवाहांचे प्रमाण जास्त असल्याने महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये बालविवाहविरुद्ध जनजागृती मोहिम राबवण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगरच्या शाळांमध्येही ही योजना राबवली गेली. या मोहिमेचा परिणाम म्हणून १२ बालविवाह रोखण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे या मोहिमेला प्रतिसाद देत मुलींच्या वर्गमित्र आणि वर्गमैत्रीणींनीच चाईल्ड हेल्पलाईनला फोन करून हे बालविवाह रोखले.

बालविवाह रोखण्यासाठी शाळांमध्ये जनजागृती

राज्यातील बालविवाह रोखण्याकरता शिक्षण विभागाने उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, सकाळच्या प्रार्थनेत बालविवाह विरुद्धची शपथ घेणे; शाळांमध्ये वक्तृत्त्व, निबंध, पोस्टर बनवणे स्पर्धा राबवणे आदी पावले उचलली गेली आहेत.

महाराष्ट्रातील शाळांमध्ये उपक्रम आणि निरिक्षणही

शिक्षण विभागाचे कन्या शिक्षणाचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर रोडगे यांनी बालविवाह रोखण्यासाठी सर्व शाळांनी हेल्पलाइन क्रमांक ठळकपणे प्रदर्शित करणे आणि जनजागृती उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे सांगून बालविवाह रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्नांवर भर दिला. तसंच, शाळांमधील या उपक्रमांवर पोर्टलद्वारे निरीक्षण केलं जातं.

“प्रगती पुस्तकावर चाइल्ड हेल्पलाइन नंबर छापण्याव्यतिरिक्त सर्व शाळांना शाळेच्या आवारात चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांना मुली तसेच मुले यांना शाळांमध्ये बालविवाहाच्या परिणामांची जाणीव करून दिली जाते. फक्त सूचना देऊन न थांबता आम्ही शाळांना या माहितीसाठी खास डिझाईन केलेल्या पोर्टलमध्ये डेटा भरण्यास सांगून सर्व कार्यक्रमांचा नियमित आढावा घेतो, ज्यामुळे शाळांना कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते”, असंही रोडगे म्हणाले.

बालविवाह कसे ओळखायचे?

शाळा संपल्यानंतर मुलींचं लग्न लावून दिलं जातं. लग्नानंतर गाव सोडून गेल्यावर या मुली पुन्हा शाळेत परतत नाहीत. त्यामुळे विद्यार्थींनीच्या दीर्घकाळ गैरहजेरीवर लक्ष ठेवलं जातं. शिवाय, पालकांची समुपदेशन केलं जातं. परिणामी बालविवाहाच्या तक्रारींमध्ये वाढ होऊन हे बालविवाह रोखण्यास यश येत आहे. चाईल्ड हेल्पलाईनद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर गेल्या वर्षभरात ३२ प्रकरणे रोखण्यात आली आहेत.

युनिसेफचे जिल्हा समन्वयक बाळकृष्ण साळुंखे यांनी प्रतिबंधापलीकडे सध्याच्या आव्हानांवर भर दिला. काही प्रकरणे ही रेड फ्लॅग असतात असं ते म्हणाले. “रेड-फ्लॅग प्रकरणांचा अर्थ असा होतो की एखाद्या मुलीचा बालविवाह रोखल्यानंतर काही पालक पुन्हा त्यांचा विवाह लावून देतात. अशा प्रकरणांवर सतत लक्ष ठेवण्याबरोबरच, आम्ही अशा मुलांना, विशेषत: मुलींना कौशल्य शिक्षणाच्या व्यावसायिक वर्गात दाखल करतो. गरज पडल्यास या मुलींमध्ये आत्मविश्वास जागृत करणे हा यामागील विचार आहे”, असे सांगून साळुंखे म्हणाले की, चाइल्ड हेल्पलाइनवर आलेल्या कॉल्सपैकी काही मुलींनी स्वतःच्या लग्नाविरोधात तक्रार केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Classmates help prevent 12 child marriages through helpline number on report cards sgk