खासगी रूग्णालयात उपचार केल्याबद्दल ४० हजारांचे देयक मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील लिपिकासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
विक्रम बिरप्पा होनपारखे (रा. शेळगी, सोलापूर) हे रयत शिक्षण संस्थेच्या वांगी (ता. करमाळा) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सहशिक्षकपदावर सेवेत आहेत. त्यांच्या आईला दीड वर्षांपूर्वी अर्धागवायूचा झटका आला असता त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. या उपचारासाठी ४० हजारांचा खर्च झाला असता त्याचे देयक मंजूर होण्यासाठी होनपारखे यांनी शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे रीतसर प्रकरण सादर केले होते. परंतु हे देयक मंजूर करण्यासाठी तेथील लिपिक रमाकांत सुभाष फुटाणे (३७, रा. कर्णिक नगर, सोलापूर) याने चार हजारांची लाच मागितली होती. यात सांगोला तालुक्यातील देशभक्त  संभाजीराव विद्यालयातील शिपाई भीमाशंकर तुकाराम भोई याने मध्यस्थी केली होती. तडजोडीत तीन हजारांची लाच देण्याचे ठरले. तथापि, यासंदर्भात होनपारखे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. यात लिपिक फुटाणे व मध्यस्थी भोई या दोघांना पकडण्यात आले.