मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणीकरता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभा केला आहे. दोन टप्प्यांत त्यांनी बेमुदत उपोषण करून सरकारला आपल्या मागण्यांवर विचार करण्यास भाग पाडलं आहे. त्यामुळे तरुणांसह अबालवृद्धांमध्ये मनोज जरांगे पाटलांविषयी आदर निर्माण झाले. परिणामी अनेकांनी जरांगे पाटलांची तुलना डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आहे. यासंदर्भातील अनेक लेख, ग्राफिक्स सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत. यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> “…त्यामुळे चेहऱ्यावरचं हसू जातंय”, मनोज जरांगेंनी दिली प्रकृतीविषयी माहिती

मनोज जरांगे पाटलांनी आज जालन्यातील खासगी रुग्णालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले. तसंच, डॉ.बाबासाहेबांनी समाजाला न्याय मिळवून दिला, त्यामुळे त्यांच्याशी तुमची तुलना केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांशी तुमची तुलना करतात. ही तरुणांची भावना आहे. या तरुणांबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न मनोज जरांगे पाटलांना विचारण्यात आला.

“हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे. मी कोणात ढवळाढवळ करणार नाही. पण मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा सेवक आहे. सर्वसामान्यांचा सेवक आहे. कारण ते रक्त आपल्यात आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळेच या देशाला दिशा मिळाली. त्यांच्या विचारांशिवाय वंचितांना न्याय मिळू शकत नाही. ते विचार घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय माणसाची किंवा एखाद्या समूहाची प्रगती होणार नाही. नाहीतर प्रगती खुंटलीच म्हणून समजा”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

गावागावात शांततेत उपोषण करणार

“डिसेंबरपासून प्रत्येक गावागावात पुन्हा महाराष्ट्रभर साखळी उपोषण शांततेत सुरू करायचं आहे. न्यायाचा दिवस जवळ आला आहे. शेतीतले कामे करत असताना आपल्या लेकरांच्या भविष्याचा विषय डोक्यात ठेवायचा आहे”, असंही मनोज जरांगे म्हणाले.

कायदा-सुव्यवस्था राखा

“आपण बेमुदत उपोषण स्थगित केलं असलं तरीही आताही आंदोलन चालू आहे. आंतरवालीसह महाराष्ट्रात साखळी उपोषण चालू आहे. मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याशिवाय ते थांबणार नाही. पुन्हा एक विनंती आहे की उद्रेक किंवा कायदा मोडेल असं कृत्य करायचं नाही”, असं आवाहनही त्यांनी मराठा आंदोलकांना केलं.

महाराष्ट्र दौरा करणार

“महाराष्ट्र दौऱ्याबाबत आज कार्यक्रम आखला जाईल. आपण पुन्हा एकदा मराठा समाजाचा आशीर्वाद घ्यायला जायचं आहे. २४ डिसेंबर आरक्षणाची अंतिम तारीख आहे. तर दौरा उद्या-परवापासूनच सुरू होणार आहे”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comparison with dr babasaheb ambedkar and chhatrapati shivaji maharaj manoj jarange sgk