अहिल्यानगर :सेवा हमी कायद्यानुसार महसूल विभागाच्या विविध प्रकारच्या १५ सेवा नागरिकांना सेतू तथा महा-ई-सेवा केंद्रामार्फत दिल्या जातात. या सेवांबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी असतात. या तक्रारींवर आता लक्ष ठेवून सेतू केंद्र चालकांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘अभिप्राय कक्ष’ नावाने नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना कायद्याने ठरवून दिलेल्या कालावधीत व शुल्कानुसार सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे तसेच कारवाईसाठी पाठपुरावाही होणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या संकल्पनेनुसार हा कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. सेवा हमी कायद्यानुसार विहित कालावधीत ठरवून दिलेल्या सेवा नागरिकांना देण्याचे धोरण ठरवले गेले. त्यानुसार जिल्ह्यात ७०६ सेतू केंद्रांमार्फत विविध प्रकारच्या १५ सेवा महसूल विभाग नागरिकांना उपलब्ध करते. या सेवांचा कालावधी ७ दिवसांपासून तर ते ४५ दिवसांपर्यंत आहे तसेच त्यासाठी कमीत कमी ६९ रुपये व जास्तीत जास्त १२८ रुपये दर आकारला जातो.

उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, जातीचे प्रमाणपत्र, मिळकत प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, रहिवास व अधिवास (राष्ट्रीयत्व) प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, ऐपत प्रमाणपत्र, श्रावणबाळ व संजय गांधी योजनांसाठी लागणारे प्रमाणपत्र आदी सेवा कायद्याद्वारे अधिसूचित करण्यात आल्या आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील रोज ४ ते ५ हजार नागरिक या सेवांचा लाभ घेतात. मात्र अनेकदा या सेवा दिलेल्या मुदतीत उपलब्ध होत नाहीत, त्यासाठी सेतू केंद्र चालकांकडून ठरवून दिल्यापेक्षा अधिक शुल्क आकारले जाते, त्याची पावतीही दिली जात नाही आदी स्वरूपाच्या तक्रारी होत असतात. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताना या तक्रारींमध्ये भर पडते. नागरिकांच्या या तक्रारीची दखल या कक्षामार्फत घेतली जाणार आहे.

क्यूआर कोडही उपलब्ध करणार

अभिप्राय कक्षात १० संगणकासह १० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे कर्मचारी सेवा कायद्यान्वये लाभ घेणाऱ्या नागरिकांना दिवसभरात किमान १ हजार जणांना थेट दूरध्वनी करून दिलेल्या मुदतीत, ठरवून दिलेल्या शुल्कात सेवा उपलब्ध झाली का व सेतू चालकाचे वर्तन कसे होते, याची माहिती विचारणार आहेत. तक्रार असल्यास त्याची नोंद करून कारवाईसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवणार आहेत. उपविभागीय अधिकारी सेतू चालकास नोटीस पाठवून सुनावणी घेतील व तथ्य आढळल्यास कारवाई करतील. यासाठी अभिप्राय कक्षाचा ०२४१- २३१००६१ हा संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. लवकरच नागरिकांना क्यूआर कोडद्वारे तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासन विभागाचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी सांगितले.

अधिक चांगली सेवा मिळेल

सेतू केंद्रामार्फत विविध सेवा नागरिकांना दिल्या जातात. या सेवा विहित कालावधीत दिल्या जातात का, त्यासाठी किती शुल्क आकारले जाते, केंद्र चालकाची वर्तणूक कशी आहे, याचे अभिप्राय नागरिकांकडून मागवले जाणार आहेत. त्यासाठी कक्षातील कर्मचारी थेट नागरिकांना दूरध्वनी करतील. यामुळे सेतू केंद्र चालकांच्या कामावर नियंत्रण ठेवून अधिक चांगली सेवा देणे शक्य होणार आहे. – गौरी सावंत, उपजिल्हाधिकारी, अहिल्यानगर