पालघर : जिल्ह्यातील अनेक करोना रुग्णालयांत रुग्णांना उपचारांसाठी गेल्या काही दिवसांपासून खाटा उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची फरफट होत आहे. अशा स्थितीत उपचारांसाठी रुग्णालय शोधता शोधता एका रुग्णाला रिक्षातच आपला जीव गमवावा लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बोईसर पूर्वेकडील श्रीरंग गावडे (५५)  यांना  श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांचा मुलगा व त्यांची पत्नी यांनी त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी ताबडतोब रिक्षा मागविली. रिक्षातून अनेक रुग्णालये फिरल्यानंतरही त्यांना खाट उपलब्ध झाली नाही. शेवटी गावडे यांना अधिकच त्रास होऊ लागल्याने त्यांचा मुलगा व त्यांची पत्नी यांनी त्यांना घेऊन बोईसर पूर्वेकडील एका करोना उपचार केंद्राकडे आणले. तेथेही त्यांना खाट उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. शनिवारी अनेक तासांची फरफट झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या श्रीरंग गावडे यांनी रिक्षातच या रुग्णालयासमोर आपला प्राण सोडला. कोणीतरी मदत करेल या आशेने त्यांचा मृतदेह रिक्षातच अनेक तास ताटकळत होता. मात्र त्यांच्याकडे कोणीही फिरकले नाही.

उपचारांअभावी अशा रुग्णांचा मृत्यू होणे ही गंभीर घटना असल्याचे संदेश अनेक समाजमाध्यमांवरून वाऱ्यासारखे फिरत होते. जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासन हे येथील रुग्णांना उपचार करण्यासाठी कमी पडत असून करोना संदर्भातील आरोग्यसुविधा अपुऱ्या पडत असल्याने त्या सुविधा उभारण्यात दोन्ही प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप  या संदेशाद्वारे करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona patient dies in rickshaw due to lack of treatment zws