सुवर्णजयंती रोजगार योजनेमध्ये बेरोजगारांना प्रशिक्षण देण्याची निविदा न काढता, तसेच खोटे लाभार्थी दाखवून औरंगाबाद महापालिकेत १ कोटी ७० लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला. या प्रकरणी उपायुक्त डॉ. आशिष पवार व प्रकल्प संचालक प्रमोद खोब्रागडे या दोघांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर दोघांना शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली. कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूटला प्रशिक्षणाचे हे काम निविदा न काढताच देण्यात आले होते. तब्बल १ हजार १४४ लाभार्थी बनावट दाखवून करण्यात आलेला हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्याबाबतची तक्रार महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांच्या सूचनेवरून देण्यात आली.
औरंगाबाद महापालिकेच्या वतीने बेरोजगार तरुणांना प्लंबर, डिझायनर, ब्युटीपार्लर यांसह विविध १० प्रकारची प्रशिक्षणे देण्यासाठी निवडलेली संस्था, सरकारने ठरवून दिलेल्या संस्था याचे निकष न पाळता गैरव्यवहार करण्यात आला. १ हजार १४५ लाभार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले, असे भासवून १ कोटी ७० लाख रुपयांचा धनादेश कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट नावाने काढण्याचा घाट उपायुक्त पवार व प्रकल्प संचालक खोब्रागडे यांनी घातला होता.
या योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्य समाजातील दारिद्रय़रेषेखालील व्यक्तींना प्रशिक्षण मिळावे असा हेतू होता. महापालिकेने यादी तयार करताना लाभार्थी कसे निवडावेत, याबाबतचे नियम पाळले नाहीत. कौशल्य विकास करण्यासाठी देण्यात आलेल्या कोटय़वधींच्या निधीत बनावट कागदपत्रे तयार केली आणि अपहार केला, अशी तक्रार दाखल करण्यात आल्याने पोलीस निरीक्षक एन. एस. कोल्हे यांनी उपायुक्त पवार व खोब्रागडे यांना शुक्रवारी अटक केली. त्यांच्याविरोधात फसवणूक, अपहार व कागदपत्रात हेराफेरी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2015 रोजी प्रकाशित
एक कोटी ७० लाखांचा प्रशिक्षण घोटाळा
सुवर्णजयंती रोजगार योजनेमध्ये बेरोजगारांना प्रशिक्षण देण्याची निविदा न काढता, तसेच खोटे लाभार्थी दाखवून औरंगाबाद महापालिकेत १ कोटी ७० लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला.

First published on: 11-04-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corruption in aurangabad corporation