ब्रिटिशांच्या राजवटीतही एवढे अत्याचार झाले नसतील. कनगरा येथील निरपराध ग्रामस्थांना बेदम मारहाण व त्यांच्या घरांचे नुकसान करणाऱ्या पोलिसांनी ब्रिटिश व मोगालाईला लाजवेल असेच कृत्य केले आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक सचिन पाटील व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह इतर दोषींना तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे आमदार बाळा नांदगावकर यांनी केली.
उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा गावात पोलीस प्रशासनाकडून दारुबंदी करणाऱ्या ग्रामस्थांना बेदम मारहाण करण्यात आली. या पाश्र्वभूमीवर आमदार नांदगावकर यांनी गुरुवारी कनगरा गावास भेट देऊन पाहणी केली. यानंतर पत्रकार बैठकीत ते बोलत होते. मनसे जिल्हाध्यक्ष इंद्रजित देवकते, माजी जिल्हाध्यक्ष अनिल मंजुळे, अमर परमेश्वर, प्रशांत नवगिरे आदींची उपस्थिती होती.
कनगरा ग्रामस्थ व्यसनमुक्तीसाठी दारूबंदीची मागणी करीत होते. परंतु दारूबंदीविरोधात आवाज उठवताच पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली. लाठीमार करून कोणाचा हात, कोणाचा पाय तर कोणाचे अन्य अवयव निकामी केले. गावच्या भेटीत आपणाला ग्रामस्थांमध्ये संताप व उद्रेक दिसून आला. तो स्वाभाविकच आहे, असे नांदगावकर म्हणाले. दारू धंदा चालविणाऱ्या राठोडवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करावी. ज्या पोलिसांनी दारू पकडल्यानंतरही त्याचे पुरावे नष्ट केले, त्यांना या प्रकरणात सहआरोपी करावे. पोलीस अधीक्षक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडुकर यांच्यासह अन्य दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे. या प्रकरणी चौकशी न करता, विधिमंडळात एकमताने पोलीस अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी. कनगऱ्यातील मुस्लिम तसेच मागासवर्गीय बांधवांवर पोलिसांनी अत्याचार केले आहेत. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंदवावेत. मुख्यमंत्री निधी किंवा पोलीस कल्याण निधीतून गंभीर जखमी ग्रामस्थांच्या उपचाराचा खर्च करावा आदी मागण्या त्यांनी केल्या. कनगरा ग्रामस्थांच्या पाठीशी राहून त्यांच्या आंदोलनास सहकार्याची ग्वाही त्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Danger incident than british mughlai bala nandgaonkar