‘तेव्हा आमची चूक झाली. दीपकच्या कामाला विरोध केला, पण त्याने केलेले काम आता आनंद देत आहे. तमाशा कलावंत, ऊसतोड कामगारांच्या मुलांबरोबर माझा नातूही दहावीत शिकतो आहे. आनंद वाटतो.’ अनाथ, वंचित मुलांसाठी झटणाऱ्या दीपक नागरगोजे यांच्या आई त्यांचे कौतुक करीत होत्या. बाबा आमटे यांच्या प्ररणेतून आपल्या गावातील समस्येवर मात करायची या प्रेरणेने काम सुरू करणाऱ्या नागरगोजे दाम्पत्याने बीड जिल्ह्यत सुरू केलेले ‘शांतिवन’ सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक तरुणांचे प्रेरणास्थान बनते आहे. या प्रकल्पात आता ३०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात ८० मुली प्रकल्पात निवासी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोठय़ा कष्टाने हा उभा राहिला, असे दीपक नागरगोजे यांच्या पत्नी कावेरी सांगत होत्या. ‘पहिले काही दिवस वीज नव्हती. कारण प्रकल्पच शेतात होता. वेगवेगळय़ा परिस्थितीमध्ये वाढलेली मुले. कोणी तमाशा कलावंताचा मुलगा तर कोणी ऊसतोड मजुराची मुलगी. कोणी शाळेचे तोंड न पाहिलेले तर कोणी अर्धवट शाळा सोडलेली. त्यांना सांभाळताना मोठी कसरत असते. एकदा मुले झोपली का, हे पाहण्यासाठी गेले. तेव्हा साप चावला. १५ दिवस बीडच्या रुग्णालयात होते. नातेवाईकांनी ‘हे काम बंद करा’ असे बजावून सांगितले. पण, या निरागस मुलांच्या प्रार्थनेमुळेच जीव वाचल्याची भावना झाली आणि वंचित मुलांच्या शिक्षणाचे शांतिवन सुरू झाले. कधी किराणा आणायला पैसे नसायचे तर कधी मुलांसाठी कपडे. अनेक दु:खाचे प्रसंग वाटय़ाला आले, असे कावेरी सांगत होत्या.

दीपक नागरगोजे म्हणाले, ‘एक मुलगी लालबत्ती भागातील. दहा वर्षे प्रकल्पामध्ये ती शिकली. हुशार होती. पण तिची आई तिला घेऊन गेली. तेव्हा खूप वाईट वाटले. बऱ्याचदा पैसे नसायचे. उधारी झाली. कर्जदार दारात येऊ लागले. मग वडिलोपार्जित जमीन विक्रीला काढली. त्या दिवशी वडिलांच्या डोळय़ांत पाणी आले. रात्रभर झोपलो नाही. पण दुसऱ्या दिवशी अनाथ मुलांचे हसू पाहिले आणि पुन्हा काम करीत राहिलो. आता या प्रकल्पात मुलींसाठी वसतिगृह नाही. ती मोठी गरज आहे. ती पूर्ण झाली तर ‘शांतिवन’ला आकार येईल.’ तसे या प्रकल्पाला सातत्याने मदत करणारे हातही आहेत. सुरेश जोशी हे त्यापैकीच एक. दुष्काळी भागातील आर्वीमध्ये पाणी आणण्यासाठी मोठे सहकार्य केले. ते संस्थेचे विश्वस्तही आहेत. मात्र, अशी संस्था चालविणे हे मोठे जिकिरीचे काम असते. अशा प्रकल्पांना सतत मदतीचा ओघ राहिला तरच चांगले काम टिकेल.’

‘मोठय़ा कष्टाने उभारलेला बीड जिल्ह्यतील हा प्रकल्प निश्चितच सामाजिक काम करणाऱ्यांना प्रेरणा देणारा आहे. या प्रकल्पापूर्वी ‘नाम’च्या माध्यमातून काही मदत आम्ही देऊ शकलो. पण अशा प्रकल्पाच्या सर्व गरजा पुरवणे कोणत्याही एका संस्थेचे वा व्यक्तीचे काम नाही. सर्वानी त्यासाठी हातभार लावला तरच चांगले काम उभे राहते. त्यामुळे ‘शांतिवन’ला अधिकाधिक मदत मिळावी असे वाटते,’ असे मत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.

बीड जिल्ह्यतून दरवर्षी साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी हजारो कामगार जातात. त्यांच्या मुलांसह विविध कारणांनी शाळेत न जाऊ शकणाऱ्या अनेकांसाठी दीपक नागरगोजे यांचे काम महत्त्वपूर्ण आहे. कोणत्याही आधाराशिवाय चालणाऱ्या प्रकल्पाला आता समाजाच्या आर्थिक सहकार्याची गरज आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak nagargoje kaveri nagargoje started shantivan in beed for social cause