अर्थसंकल्पात संरक्षण विभागाच्या निधीमध्ये केलेली वाढ अपुरी आहे. वाढलेला निधी महागाईच्या तुलनेत कमीच असून त्यामुळे संरक्षणाच्या आधुनिकीकरणाला खीळ बसेल, असे मत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. संरक्षण विभागाला दिलेल्या अपुऱ्या निधीचा लष्कराच्या आधुनिकतेवर परिणाम होणार आहे. याबाबत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर यांनी सांगितले, ‘‘महागाई वाढल्यामुळे युद्धसामग्रीच्या किमती वाढल्यात. अर्थसंकल्पात संरक्षण विभागाला दिलेला पैसा हा दैनंदिन वापरासाठीच लागतो. संरक्षण विभागाचे आधुनिकीकरण करण्यासाठी तो पुरणार नाही. याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे देशाच्या युद्धक्षमतेवर परिणाम होणार आहे. परिणामी आपण प्रत्यक्ष आक्रमण करणार नाही, याची माहिती शत्रूला असल्यामुळे त्याचा अंतर्गत सुरक्षिततेवर परिणाम होईल.’’
ब्रिगेडिअर हेमंत महाजन म्हणाले, ‘‘देशाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी संरक्षण विभागासाठी फक्त पाच सेकंद वेळ दिला. संरक्षण विभागासाठी २०३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, ही तरतूद कमीच असून गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त एका टक्क्य़ाने निधी वाढवून दिला आहे. वाढती महागाई पाहाता किमान सहा ते सात टक्क्य़ांनी निधी वाढवून देणे अपेक्षित होते. आपले शत्रू पाकिस्तान व चीन या देशांकडून मोठय़ा प्रमाणात संरक्षणावर खर्च केला जात आहे. आपण किमान पाकिस्तानएवढा तरी संरक्षणावर खर्च करणे अपेक्षित आहे. एखादे विमान, शस्त्र खरेदी करायचे असेल तर त्याची मागणी सहा- सात अगोदरच करावी लागते. निधीची तरतूद कमी असल्यामुळे सैन्याच्या आधुनिकीकरणावर परिणाम होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संरक्षणविषयक ठळक तरतुदी
*     २०१३-१४ या वित्तीय वर्षांसाठी २ लाख ३ हजार ६७२ कोटींची तरतूद अर्थमंत्र्यांनी संरक्षण क्षेत्रासाठी केली आहे.
*     यापैकी प्रस्तावित भांडवली खर्च ८६ हजार ७४१ कोटी रुपये आहे.
*     गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी २५ हजार १६९ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी प्रारंभी १ लाख ९३ हजार ४०७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांमुळे, १ लाख ७८ हजार ५०३ कोटी रुपये अशी सुधारित तरतूद केली गेली.
*     अर्थसंकल्पातील एकूण प्रस्तावित खर्चाच्या सव्वा बारा टक्के इतकी रक्कम संरक्षण क्षेत्रासाठी
*     गतवर्षीच्या सुधारित तरतुदींच्या तुलनेत १४ टक्क्यांनी वाढ
*     चीनच्या सीमेवरील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणणे आणि एकूणच संरक्षण सामग्रीच्या खरेदीसाठी वाढीव तरतुदी
*     मध्यम पल्ल्याच्या आणि बहुउपयोगी अशा १२६ लढाऊ विमानांची खरेदी, अपाची या हल्ला करू शकणाऱ्या २२ हेलिकॉप्टरांची खरेदी, अत्यंत हलक्या अशा १४५ हॉवित्झर तोफा आणि जास्त वजन वाहून नेण्याची क्षमता असलेल्या १५ हेलिकॉप्टरांची खरेदी करण्याचे उद्दिष्ट.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defence provision in budget 013 14 is insufficient defence expert