नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या कार्यक्षम आमदार पुरस्कारासाठी यंदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. ५१ हजार रुपये, स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे वितरण माधवराव लिमये यांच्या स्मृतीदिनी ७ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी सहा वाजता परशुराम साईखेडकर नाटय़गृहात होणार आहे. डॉ. विनायक आणि डॉ. शोभाताई नेर्लीकर यांनी दिलेल्या देणगीतून डॉ. शोभाताई यांचे वडील माजी आमदार, लेखक व पत्रकार माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सावानातर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार निवड समितीत आ. उत्तम ढिकले, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर, दै. गांवकरीचे कार्यकारी संपादक शैलेंद्र तनपुरे, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह मिलींद जहागिरदार व डॉ. विनायक नेर्लीकर यांचा समावेश होता.