पंढरपूरचा विठ्ठल हा कष्टकऱ्यांचा, गोरगरिबांचा देव. महाराष्ट्रासहीत देशभरातील कोट्यवधी लोक पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी एकदा तरी नतमस्तक होत असतात. आज वसंतपंचमीच्या मुहूर्तावर विठुराया आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा साजरा केला जात असतो. यानिमित्त देशभरातून लाभो भाविक पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात. भाविक आले तर दान-धर्म होणारच. पण आजच्या सोहळ्यासाठी पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी सर्वात मोठे दान अर्पण करण्यात आले आहे. तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दान करणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख उघड न करण्याची अट देवस्थानासमोर ठेवली. एबीपी माझाने दिलेल्या बातमीसमोर सदर दानशूर भाविक महिला असून त्या जालना जिल्ह्यातील असल्याचे कळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वस्तू शाही विवाह सोहळ्यासाठी दान

आज पंढरपूरमध्ये विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या शाही विवाह सोहळ्याची लगबग होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सदर भाविक महिलेने दिलेले दान महत्त्वाचे ठरते. मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी माहिती दिली की, या दानामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला सोन्याचे मुकुट, मोहोन माळ, रुक्मिणी मातेला कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी अशी सोन्याची दागिने दान केली आहेत. तर देवाच्या रोजच्या पुजाअर्चासाठी लागणारे चांदीचे मोठे ताट, वाटी, समई, तांब्या, भांडी, ताम्हण, पळी आणि देवासाठी चांदीचा आरसा अशा वस्तू या दानामध्ये समाविष्ट आहेत.

मागच्या ५० वर्षांतील हे सर्वात मोठे दान असल्याचे पंढरपूर देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले आहे. आज वसंतपंचमीसोबतच ७४ व्या प्रजासत्ताक दिन आहे. यानिमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आणि देवाच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट व आरास करण्यात आली आहे. तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी खास चेन्नई व बंगळुरु येथून रेशमाचे पांढरे वस्त्र आणण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devotee donated jewellery worth two crore at vitthal rukmini temple in pandharpur kvg