नवरात्रोत्सवानंतर पाठोपाठ कोजागरी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरला हजारो भाविक पायी चालत जात आहेत. स्त्री-पुरूषांसह लहान मुलं-मुलीही पायवाट तुडवत तुळजापूरला जात आहेत. यानिमित्ताने तुळजापूर रस्त्यावर अक्षरश जत्रेचे स्वरूप आले आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटकातील विजापूर, बागलकोट, गदग आदी दूर अंतरावरून असंख्य भाविक श्रध्दाभावाने पायी चालत तुळजापूरला जातात.
नवरात्रोत्सव संपल्यानंतर सर्व भाविकांना कोजागरी पौर्णिमेचे वेध लागतात. दोन दिवस अगोदरपासूनच भाविकांच्या मार्गक्रमणाला प्रारंभ होतो. ‘आई राजा उदो उदो’ चा उद्घोष करीत, मजल-दरमजल करीत तुळजापूरची वाट धरली जाते. वाटेत काही ठिकाणी विसावा घेतल्यानंतर पुढची पायवाट तुडवली जाते. प्रत्येकाला तुळजाभवानी मंदिरात जाऊन तुळजाभवानी मातेच्या दर्शनाची ओढ लागली असते. अनेक भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळत नाही. त्यामुळे भाविक मंदिराच्या शिखर दर्शनाला समाधान मानतात. शिखर दर्शनासाठीही मोठी कसरत करावी लागते.
तुळजापूर वाटेवर अनेक ठिकाणी विविध सार्वजनिक संस्था तथा मंडळांकडून भाविकांची सेवा केली जाते. चहा-नाष्टा, विश्रांती, अंघोळ, आरोग्य तपासणी तथा प्राथमिक औषधोपचार तसेच भ्रमणध्वनीसाठी बँटरी चाìजग इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध होतात.
यंदा कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी चालत जाताना वाटेत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होते. त्यामुळे स्वच्छतेचा संदेशही दिला जात आहे. याच स्वच्छता संदेशाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापूर महापालिकेचे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील हे सपत्नीक तुळजापूरला पायी चालत आनंद लुटण्याचा अनूभव घेत आहेत.