मुलाखतीनंतर सेवेत रूजू; वसई-विरार महापालिकेचा निर्णय
वसई : वसई-विरार महापालिकेने आता करोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभागात मेगा भरती करण्याचे ठरवले आहे. डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय, तंत्रज्ञ आदींची भरती केली जाणार आहे. थेट मुलाखतीनंतर त्यांना लगेचच सामावून घेतले जाणार आहे. सेवेत आलेल्या कुणालाही नंतर कमी केले जाणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे जागांची मर्यादा नसल्याने जेवढे येतील त्या सर्वांना सेवेत घेतले जाणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागात १४२ डॉक्टर्स, २५८ परिचारिका, २६१ साहाय्यक परिचारिका, ७८ कक्षसेवक आणि सेविका तसेच लिपिक, साहाय्यक कर्मचारी आणि तंत्रज्ञ कार्यरत आहेत. पालिकेचे २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, वसई येथील सर डी.एम.पेटिट रुग्णालय आणि नालासोपारा येथील तुळिंज रुग्णालय आहे. याशिवाय पालिकेने तयार केलेले चंदनसार रुग्णालय, वरुण इंडस्ट्री करोना केंद्र, माता बालसंगोपन केंद्रे येथे हे कर्मचारी कार्यरत आहेत. पालिकेने आपल्या विभागातील इतर कर्मचाऱ्यांचीदेखील करोना केंद्रावर नियुक्ती केली आहे. करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत पालिकेने विरारच्या म्हाडा येथील इमारतीत, तसेच शहरातील मासळी बाजारपेठांमध्ये करोना केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र रुग्ण वाढत असल्याने हे मनुष्यबळ अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे पालिकेने आता आरोग्य विभागात अधिकाधिक डॉक्टर्स आणि परिचारिकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिका सध्या एमबीबीएस डॉक्टरांना ७५ हजार, बीएएमएस डॉक्टरांना ५० हजार आणि बीएचएमएस डॉक्टरांना ४० हजार एवढे मासिक वेतन देते. नवीन भरती होणाऱ्या डॉक्टर्स आणि परिचारिकांनादेखील याच वेतनश्रेणीत वेतन दिले जाणार आहे. नव्याने भरती होणाऱ्या डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांच्या करारावर सेवेत सामावून घेतले जाईल. हा करार नियमित वाढवला जाणार आहे. मात्र भरती केलेल्या कुणालाही कमी केले जाणार नसल्याची ग्वाही पालिकेने दिली आहे.
शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्य मनुष्यबळाची गरज यापुढील काळातही भासणार आहे. त्यामुळे आतापासूनच आम्ही आरोग्य सेवेत भरती करण्यासाठी सुरुवात केली आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त डॉ. किशोर गवस (आरोग्य) यांनी दिली. थेट मुलाखतीनंतर यांना तात्काळ सेवेत सामावून घेतले जाणार आहे. डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने पालिकेच्या आरोग्य विभागात भरती व्हा, असे आवाहन उपायुक्त गवस यांनी केले आहे.
एक महिना प्रक्रिया
भरतीसाठी मुलाखती २१ एप्रिल ते २० मे या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी १ या दरम्यान पालिकेच्या विरार येथील सी प्रभाग समिती कार्यालयात घेण्यात येतील. अर्जदारांना पालिकेच्या संकेतस्थळावर आपले अर्ज करता येणार आहेत. निवड होताच दोन दिवसांत सेवेत रुजू व्हावे लागणार आहे. डॉक्टरांच्या पदासाठी वयाची अट नसून परिचारिकांनाही ४० वर्षे वयाटी अट आहे. अधिक माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.