नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात कुठलाही हिंसाचार होऊ न देता लोकसभा व विधानसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यात तसेच जहाल नक्षली निर्मलाकुमारी उर्फ नर्मदा हिच्या अटकेसह नक्षली कमांडर विलास कोल्हा व ३५ नक्षलींचे यशस्वी आत्मसमर्पण करून घेतल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलातील ११६ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झाले आहे.
१ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक यांचे कार्यालयाकडून पोलीस दलात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी यांच्या नावांची यादी आज गुरूवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील सर्वाधिक ११६ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झाले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पार पडलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका, वर्षभरात उप्पगुंटी निर्मलाकुमारी उर्फ नर्मदा हिच्यासारख्या २२ जहाल नक्षलवाद्यांना अटक, एके-47 सह आत्मसमर्पण करणाऱ्या जहाल नक्षली विलास कोल्हा याच्यासह वर्षेभरात ३५ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, वर्षेभरात ९ नक्षलवाद्यांचा केलेला खात्मा आणि नक्षलविरोधी लढ्यात केलेल्या इतर उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरीमुळे या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कामगिरीचे कौतूक पोलीस महासंचालकांनी केले आहे.
या यादीमध्ये पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधिक्षक मोहीत गर्ग, अप्पर पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, यांच्यासह ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३ सहायक पोलीस निरीक्षक, २१ पोलीस उपनिरीक्षक, ७ सहायक फौजदार व ७८ पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी सर्व पदक प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.