अहिल्यानगर : श्रीरामपूर शहरातील बसस्थानकाशेजारील जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न काहीजणांनी केला. याची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे आगारप्रमुख अनिल बेहेरे यांनी लगेच आमदार हेमंत ओगले यांच्याशी संपर्क साधून अटकाव केला. आमदार ओगले हे तातडीने तेथे पोहोचले. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्या, सोमवारी या संदर्भात बैठक आयोजित केल्याची माहिती ओगले यांनी दिली. वाद सध्या जैसे थे ठेवण्यास सांगण्यात आले असून, कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.
श्रीरामपूर येथे मंजूर बसस्थानकाच्या बांधकामातील अडचणी सोडविण्यासाठी बैठक घेण्याची मागणी आमदार ओगले यांनी परिवहन मंत्री सरनाईक यांच्याकडे केली होती. बसस्थानक जेथे बांधण्याचे नियोजित आहे, ती जमीन भूसंपादन कायद्यान्वये एसटी महामंडळाकडून संपादित करण्यात आलेली आहे.
तथापि, सद्यस्थितीत ही जमीन बळकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच श्रीरामपूर नगरपरिषदेकडून बांधकाम परवानगी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे बसस्थानकाच्या कामाचे कार्यारंभ आदेश जारी केले असूनही अद्याप काम सुरू होऊ शकले नाही. यावर मार्ग काढण्यासाठी बैठक घेण्याची मागणी आमदार ओगले यांनी केली होती. त्यानुसार परिवहन मंत्री सरनाईक यांनी उद्या मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले आहे. ओगले यांच्यासह महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी, महाव्यवस्थापक (बांधकाम), विभाग नियंत्रक, पालिका मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
दरम्यान, या बैठकीअगोदरच काही व्यक्ती बसस्थानक शेजारील जिनिंग मिल व मोकळ्या जागेवर ताबा मारण्यासाठी आले होते. ही जागा आपली असल्याचा दावा एसटी महामंडळाकडून केला जात आहे. तसेच या ठिकाणची केलेली मोजणीही महामंडळाला मान्य नाही. त्यामुळे संबंधित लोक आल्यानंतर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आमदार ओगले यांना माहिती देण्यात आली. ओगले यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, अतिरिक्त अधीक्षक वाघचौरे यांच्यासह एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पोलीस पथक आल्यानंतर हा वाद तूर्त जैसे थे ठेवण्यास सांगण्यात आले. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे वाघचौरे यांनी सांगितले.
