माउलींच्या सोहळय़ातील पहिले उभे रिंगण उत्साहात

या रचनेप्रमाणे वैष्णवांच्या दाटीत अश्वांच्या नेत्रदीपक दौडीला प्रारंभ झाला. टाळ, मृदंगांच्या गजरात विठ्ठल…विठ्ठल नामाच्या उद्घोषात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळय़ातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे गुरुवारी पार पडले.

vai palkhi
माउलींच्या सोहळय़ातील पहिले उभे रिंगण उत्साहात

विश्वास पवार

वाई: अश्व धावे अश्वामागे।

वैष्णव उभे रिंगणी।

टाळ, मृदंगा संगे।

गेले रिंगण रंगुनी॥

या रचनेप्रमाणे वैष्णवांच्या दाटीत अश्वांच्या नेत्रदीपक दौडीला प्रारंभ झाला. टाळ, मृदंगांच्या गजरात विठ्ठल…विठ्ठल नामाच्या उद्घोषात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळय़ातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे गुरुवारी पार पडले.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीने लावलेली शिस्तबध्द उभी रांग..माउलींच्या अश्वांनी घेतलेली दौड..दिंडीतील वारकऱ्यांनी धरलेला ठेका..टाळ-मृदंगांच्या दाटीत रंगलेल्या फुगडय़ा अन हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाला आळवीत भारावलेल्या वातावरणात माउली, माउलीच्या जोरदार गजराने आसमंत दुमदुमत असतानाच टाळमृदंगाचा टिपेला पोहोचलेला नाद आणि हातातील भगवी पताका उंचावत तल्लीन नाचणाऱ्या वारकऱ्यांच्या उत्साहात चांदोबाचा लिंब तरडगाव येथे सोहळय़ातील पहिल्या उभ्या रिंगणाने डोळय़ाचे पारणे फेडले.

पालखीला लोणंद ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य अर्पण करण्यात आला व माध्यान्ह आरती झाली. पुढील प्रवासाला निघण्याचे संकेत देणारा भोंगा वाजताच माउलीच्या जयजयकारात मानकऱ्यांनी पालखी सजवलेल्या रथात ठेवली व लगेचच सोहळा तरडगावकडे मार्गस्थ झाला. फलटणच्या कापडगाव येथील हद्दीवर फलटण तालुक्याच्या वतीने आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप,उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड,गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे,फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी स्वागत केले. सोहळा पुढे सरकत चांदोबाचा लिंब येथे आला. या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविकांनी पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. वारकऱ्यांचा भक्तिकल्लोळ आणि रिंगणात अश्वांची दौड पाहून भावित तृप्त झाले. रिंगणानंतर सोहळा तरडगाव मुक्कामी पोहोचला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Excitement first standing arena mauli ceremony vaishnavism start ysh

Next Story
आत्मनिर्भरतेकडे अपंग.. शिक्षण, प्रशिक्षण, रोजगाराची त्रिसूत्री; शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार : ‘अनामप्रेम’ची त्रिसूत्री
फोटो गॅलरी