मोहनीराज लहाडे
नगर : शेतकरी कुटुंबातील तरुणांच्या विवाहाच्या प्रश्नाचा, ढासळत्या सामाजिक परिस्थितीचा गैरवापर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळय़ा लूटमारीसाठी करून घेऊ लागल्याने सध्या जिल्हा नव्या समस्येने ग्रासला आहे. बनावट विवाहांच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीच्या घटना मोठय़ा प्रमाणावर घडत आहेत. विवाहासाठी केवळ वधूच बनावट उभी केली जाते असे नाही, तर तिचे आई-वडील, जवळचे नातेवाईकही बनावट उभे केले जातात. नंतर संबंधित कुटुंबाची फसवणूक करून लूट केली जाते. गेल्या दोन वर्षांत असे २२ गुन्हे जिल्ह्यात दाखल झाले असून ८७ जणांना अटक करण्यात आली आहे.
सधन शेतकरी कुटुंबातील तरुण असला तरी पती म्हणून स्वीकारण्यास मुली नकार देतात. त्याची अनेक कारणे आहेत. जिरायत भागातील शेतकरी तरुणांची अवस्था तर त्याहूनही बिकट आहे. त्यातून शेतकरी कुटुंबातील तरुणांचे वय वाढून विवाह रखडतात. कमी पगार असला तरी मुली नोकरी करणाऱ्या तरुणाला विवाहासाठी प्राधान्य देतात. काही प्रमाणात मुलींचा घटलेला जन्मदरही त्यास कारण ठरतो. परिणामी शेतकरी कुटुंबातील लग्नाळू तरुणांच्या विवाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकरी कुटुंबांतील लग्नाळू किंवा वय वाढलेले तरुण हेरून, त्या कुटुंबाची आर्थिक फसवणूक करण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा कुटुंबाची ओळख काढून मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम केला जातो. ‘‘मुलीला आई-वडील नाहीत, मामा-मावशी, नातेवाईकांकडे राहते, त्यांना खर्च म्हणून काही रक्कम द्यावी लागेल’’, असा बनाव रचला जातो. अनेकदा अशा या बनावट वधूंचे पूर्वीच विवाह झाले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. परंतु अखेर वाढलेल्या वयात का होईना मुलाचा विवाहयोग जुळून येत असल्याचे पाहून कुटुंबीय, जवळचे नातलग फारशी चौकशी न करताच मुलीच्या बनावट नातलगांना मागितलेली काही लाख रक्कम देऊन विवाह उरकून टाकतात. अनेकदा असे विवाह झटपट, मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत, गावातील मंदिरात लावले जातात.
वधूचे आई-वडील, नातलगही बनावट
वधू घरी येऊन दोन-तीन दिवस होत नाही तोच वधूने घरातील दागिने, किमती चीजवस्तू घेऊन पोबारा केलेला आढळतो किंवा एखादा अनोळखी तरुण घरी येतो आणि सांगतो की तुमची सून माझी पत्नी आहे, आमचा विवाह पूर्वीच झाला आहे. सूनही आकांडतांडव करत, अत्याचार केल्याची धमकी देत अंगावरील दागिन्यांसह त्या अनोळखी व्यक्तीसह पलायन करते. काही कुटुंबांनी पोलिसांकडे तक्रार करून, गावातील इतरांच्या मदतीने अशी बनवेगिरी करणाऱ्यांना पकडून दिले आहे. पोलिसांच्या चौकशीत बनावट विवाहाचे प्रकरण उघडकीस येते, मुलीचे आई-वडील, लग्नाला उपस्थित असलेले नातेवाईक सारेच बनावट आढळतात.
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत दाखल झालेल्या २२ गुन्ह्यांत आत्तापर्यंत पोलिसांनी ८७ जणांना अटक केली आहे. खरेतर प्रतिष्ठा पणाला लागत असल्याने पोलिसांकडे तक्रार करण्याचे प्रमाण कमी आहे. आर्थिक फसवणूक झालेल्या कुटुंबांची संख्या अधिक आहे. या गुन्ह्यांत काही महिलांनाही अटक झाली आहे.
काही तरुणींचे पूर्वीच विवाह झाल्याचे निष्पन्न झाले आहे. फसवणूक करणाऱ्या टोळीने एकापेक्षा अधिक गुन्हे केले आहेत. त्यामुळे बनवेगिरी सफाईदारपणे सुरू आहे. यातील बहुतांशी टोळय़ा मराठवाडा-विदर्भातील आहेत. पोलीस केवळ फसवणुकीचे गुन्हे दाखल करतात. त्यामुळे आरोपींना जामीनही लगेच मिळतो. खरेतर हे लूटीचे पूर्वनियोजित असे कटकारस्थान ठरते, त्यादृष्टीने पोलिसांनी अधिक कठोर कारवाई करायला हवी.
जनजागृतीची आवश्यकता
पूर्वी नात्यागोत्यातून ओळखीच्या मार्फत विवाहाचे प्रस्ताव येत. त्यातून खातरजमा होत असे. परंतु आता सामाजिक परिस्थिती बदलल्याने विवाह जुळवण्याच्या क्षेत्रात खात्रीशीर मध्यस्थ मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे बनावट विवाह घडवणाऱ्या टोळय़ा कार्यरत झाल्या आहेत, असे शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पठारे यांनी सांगितले. सरकारी पातळीवरूनही जनजागृतीस चालना देणे आवश्यक आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांना पाठबळ मिळायला हवे, असे पश्चिम महाराष्ट्र, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पठारे यांनी सांगितले. तर समाज प्रबोधनातून अशा गुन्ह्य़ांना पायबंद बसेल, असे नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
ही समस्या ढासळू लागलेल्या सामाजिक परिस्थितीशी आणि अर्थकारणाशी निगडित आहे. शेतकरी कुटुंबे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात, नंतर विवाहाचे प्रश्न निर्माण होतात. ही परिस्थिती आर्थिक फसवणुकीला चालना देते.
– बाळासाहेब पठारे, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र, शेतकरी संघटना
कुटुंबीयांनी चौकशी करून विवाह ठरवावा. बदललेल्या सामाजिक परिस्थितीचा गैरफायदा गुन्हेगार घेत आहेत. प्रतिष्ठेचा मुद्दा न करता तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. प्रबोधनातून अशा गुन्ह्यांना पायबंद बसेल.
-मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, नगर