ऊस दरवाढ करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा फटका एस. टी. महामंडळाला बसला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा एस. टी. विभागाचे सुमारे वीस लाखांचे आर्थिक उत्पन्न बुडाले असल्याचे सांगण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रात ऊस आंदोलन १२ नोव्हेंबरला सुरू झाल्यापासून सिंधुदुर्गातून कोल्हापूर व त्यापुढे जाणारी एस. टी. वाहतूक बंद झाली. गेल्या चार दिवसात सिंधुदुर्ग विभागाचे २० लाखांचे उत्पन्न बुडाले. तसेच या विभागाच्या दोन एस. टी. बसेसचे ५० हजारांचे नुकसान करण्यात आले.
कोल्हापूर, सांगली, सातारा, तासगांव या भागात झालेल्या आंदोलनामुळे या मार्गावर जाणाऱ्या एस. टी. बसेसना आंदोलकांनी लक्ष्य केले. त्यामुळे १२ नोव्हेंबरपासून या मार्गावरील बसेस बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातून बाहेर जाणाऱ्या अशा जवळपास ३८ फेऱ्यांवर त्याचा परिणाम झाला. दिवसाला या फेऱ्या सुमारे १८ ते २० हजार कि. मी.चा प्रवास करतात. त्यातून सुमारे पाच लाखांचे उत्पन्न मिळते. १२ ते १५ नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत जवळपास ७५ हजार कि. मी. फेऱ्या कमी धावल्याने सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले.
याशिवाय दोन एस. टी. बसेस फोडून ५० हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले. त्यामुळे पुणे, तासगांव, सांगली, कोल्हापूर अशा फेऱ्या बंद राहिल्या. शिवाय कोल्हापूर मार्गावर अध्र्यावर जाऊन बसेस थांबल्या होत्या.
आज पुणे येथे जाणाऱ्या बसेस सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. दिवाळी सणाच्या काळात एस. टी. बसमधून गोवा येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या पश्चिम  महाराष्ट्रातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली असल्याचे सांगण्यात आले.