सुपे येथे वडिलांनी मुलीवर तर वडगांव दर्या येथे चुलत भावाने बहिणीवर लैंगिक अत्याचार करून रक्ताच्या नात्याला काळिमा फासला. या घटनांमधील दोघीही पीडिता अल्पवयीन आहेत. दोघाही नराधमांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

सुपे येथे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बापाने शनिवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या मुलीस वाासनेची शिकार करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर कोठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमीकीही नराधम बापाने मुलीस दिली. घाबरलेल्या मुलीने सकाळी तिच्या आईस  बापाने केलेल्या या घृणास्पद प्रकाराची माहिती दिल्यानंतर आईने मुलीस नगरच्या चाइल्ड लाइन चमूकडे नेले. तिथे तिची चौकशी करण्यात आल्यानंतर चमूच्या सदस्यांनी सुपे पोलिस ठाण्यात येउन नराधम बापाविरोधात सोमवारी रात्री फिर्याद दाखल केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार यापूर्वी दि. २८ सप्टेंबर रोजीही या नराधमाने स्वत:च्या मुलीवर अत्याचार  करण्याचा प्रयत्न केला होता. मुलीची आई व बाप यांच्यात वारंवार भांडणे होत होती. त्याच भांडणाचा फायदा घेत नराधमाने स्वत:च्या मुलीलाच वासनेची शिकार करून मानवतेला काळिमा फासणारे कृत्य केले.

वडगांव दर्या येथे दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्या सख्ख्या चुलत भावाने घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी घडली. मुलीचे आईवडील जवळच्या गावात नातेवाइकांच्या लग्नासाठी गेले होते. शाळेला सुटी असल्याने पीडित मुलगी घरीच होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ती घरात टीव्ही पाहत असताना शेजारी राहणारा चुलत भाऊ घरात आला. त्याने पिण्यासाठी पाण्याची मागणी केल्यानंतर पीडिता पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेली असता नराधम भावाने घराचा दरवाजा लावून घेत अल्पवयीन बहिणीवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार केले. सायंकाळी आईवडील घरी आल्यानंतर वडील मारतील या भीतीने पीडितेने कोणासही काही सांगितले नाही. सोमवारी सकाळी वडील दूध घालण्यासाठी गावात गेले असता पीडितेने तिच्या आईस रविवारी तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहीती दिली. त्यानंतर तिची आई, वडील व बहीण यांनी पीडितेसह पारनेर पोलिस ठाण्यात येऊन नराधम चुलत भावाविरोधात फिर्याद दाखल केली. दोघाही आरोपींविरोधात बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन दोघांनाही जेरबंद करण्यात आल्याचे सुप्याचे पोलिस निरीक्षक राजेंद भोसले, पारनेरचे सहा. पो. निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले.