सिंहस्थासाठी सोडलेल्या विशेष रेल्वेगाडय़ांना अत्यल्प प्रतिसाद, गुजरातमध्ये आरक्षणासाठी पेटलेले आंदोलन, बिहार विधानसभा निवडणूक या घटकांचा नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यातील पहिल्या शाही पर्वणीवर  परिणाम झाल्याचे दिसत आहे. लांब पल्ल्याच्या नियमित रेल्वेगाडय़ांमधून चोवीस तासात सुमारे सव्वा लाख भाविक दाखल झाले. रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांचे प्रमाण यथातथाच आहे. यामुळे नाशिक येथे ८० लाख तर त्र्यंबकेश्वर येथे २५ लाख भाविक येणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज चुकणार असल्याचे पर्वणीच्या पूर्वसंध्येला स्पष्ट होत आहे.
एकविसाव्या शतकातील दुसऱ्या कुंभमेळ्यातील पहिली शाही पर्वणी शनिवारी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होत आहे. सिंहस्थासाठी तब्बल २५०० कोटींची विकास कामे करत अतिशय व्यापक प्रमाणात नियोजन करण्यात आले. प्रत्येक पर्वणीला देश-विदेशातुन लाखो भाविक सहभागी होतील असा अंदाज आहे. परंतु, पहिल्याच पर्वणीला हा अंदाज फोल ठरण्याची चिन्हे आहेत. देशातील वेगवेगळ्या भागातून सिंहस्थ विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. परंतु, शुक्रवारी या गाडय़ांमधून नाशिकरोड येथे दाखल होणाऱ्या प्रवाशांची संख्या जेमतेम राहिली. उलट उत्तर भारतातून येणाऱ्या नियमित रेल्वेगाडय़ा भरून येत असल्याचे दिसले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First shahi snan today