सांगली : हळदीवर पाच टक्के जीएसटी लागू झाल्याने व्यापारी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली असून बाजार समिती हळद हा शेतीमालच असल्याचे सांगून जीएसटी मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले.

सांगलीतील हळद बाजारपेठ मोठी असून दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल हळद व्यापारात होते. सांगलीचे हळद अडते नितीन पाटील यांनी हळदीवर जीएसटी लागू होतो का, अशी विचारणा जीएसटी आयुक्तांकडे फेब्रुवारी २०२० मध्ये केली होती. यावर हळद वाळवून, पॉलिश करून बाजारात आणली जात असल्याने पाच टक्के जीएसटी लागू असल्याचे दोन दिवसापूर्वी जीएसटी आयुक्तांकडून कळविण्यात आल्याने अडते व खरेदीदार यांच्यात खळबळ माजली आहे. तसेच हळद व्यापाऱ्यात अडतदाराकडून घेतल्या जात असलेल्या दलालीवरही पाच टक्के जीएसटी असल्याचे जीएसटी विभागाकडून कळविण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत हळद हा शेतीमाल आहे किंवा नाही, याबद्दलचा वाद सुरू होता. महाराष्ट्र अग्रिम अधिनिर्णय प्राधिकारणाने हळद हा शेतीमालच असल्याचा निर्णय दिल्यानंतर हळदीला पाच टक्के जीएसटी लागू करण्यात आला. याचा परिणाम सांगलीच्या हळद बाजारावर होणार असून सांगलीतील व्यापार बाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. हळद वाळवून, पॉलिश करून शेतकरीच आणत असल्याने यावर प्रक्रिया करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे बाजार समितीचे म्हणणे असून खरेदीदारांना जीएसटी लागू करण्याच्या जीएसटी विभागाच्या निर्णयाला बाजार समिती आव्हान देणार असून खरेदीदार व अडते यांनी व्यर्थ भीती बाळगू नये, असे सभापती पाटील यांनी सांगितले.