गावातील तरुणाने काढलेली छेड व मारहाण सहन न झाल्याने तालुक्यातील तांदुळवाडी येथील एका १७ वर्षीय युवतीने विष प्राशन करून शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी झालेल्या या घटनेप्रकरणी मयत युवतीच्या वडिलांनी संशयिताविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पूनम काळे (१७) हिचे वडील एका लग्नावरून घरी परतत असताना गावातील एक तरुण त्यांच्याच घरातून बाहेर पडताना दिसला. काळे घरी गेल्यानंतर पूनम ही घरात रडताना त्यांना दिसली. त्यांनी तिची विचारपूस केली असता तिने पोखरी येथील संगम गायकवाड यास छेड काढण्यास विरोध केला असता त्याने आपणास मारहाण केल्याचे पूनमने सांगितले. त्यानंतर काळे यांनी गावातील मान्यवरांना बोलावून हा विषय त्यांच्यापुढे मांडण्यात येईल असे सांगत तिची समजूत काढली. त्यानंतर काळे हे शेळ्या चारावयास निघून गेले. पूनमची आई व भाऊ  लग्नावरून घरी परतले असता पूनम घरी नसल्याचे वडिलांना भ्रमणध्वनीवरून सांगितले. त्यानंतर पूनमचा शोध घेतला असता ती शेतातील विहिरीत मृतावस्थेत आढळून आली. नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तिचे शवविच्छेदन केले असता तिचा मृत्यू हा विष प्राशन केल्याने झाला असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे यांनी नमूद केले.

दरम्यान, संगम गायकवाड याने छेडछाड आणि मारहाण केल्यानेच पूनमने विष प्राशन करून शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे पूनमचे वडील लहानू काळे यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

संशयित गायकवाड यास तात्काळ अटक करा, जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत युवतीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा पूनमच्या नातेवाईकांनी घेतला होता. परंतु मनमाड येथील पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. राहुल खाडे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मे यांनी लवकरात लवकर संशयितास ताब्यात घेतले जाईल असे सांगितल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.