खासदार गोपीनाथ मुंडे यांनी स्वत:ची जन्मतारीख शरद पवारांच्या जन्मतारखेबरोबर जुळवून घेतल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून बीड लोकसभा मतदारसंघात होत आहे. त्याला उत्तर देत मुंडे यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. मात्र, त्यांचे नाव घेण्याचे टाळले.
 बीड जिल्ह्य़ातील केज येथे बाबुराव पोटभरे यांनी स्थापन केलेल्या बहुजन विकास मोर्चाच्या वतीने आयोजित मेळाव्यात बोलताना मुंडे म्हणाले की, स्वतच्या घराण्याबद्दल ज्यांना स्वाभिमान नाही, ते कोणाच्याही घरात जन्मून मोठे होत नाहीत. माझ्या जन्मतारखेवर चर्चा करतात, पण कधी ना कधी बीड जिल्ह्य़ातच जन्मलो. राजकारण करताना सामाजिक न्यायाची नाळ कधी तुटली नाही. भविष्यात सत्तेत येण्याची संधी मिळाली तर इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करू.
   मी बीड जिल्ह्य़ाचा, जिल्हा माझा असे म्हणालो तर राष्ट्रवादीवाल्यांच्या पोटात का दुखते? मी काय परळीच्या रेल्वे स्टेशनवर जन्माला आलो काय? मात्र आमच्याच घरच्या लोकांना याची लाज वाटत नाही. दोष कोणाला द्यावा, असेही ते म्हणाले.