महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ अर्थात, एमफुक्टोने केलेल्या राज्य सरकार बरखास्तीच्या मागणीची, तसेच २१ जुलला मुंबईत जेलभरो आणि ४ ऑगॅस्टला दिल्लीत धरणे आंदोलनाची दखल राजभवनने घेतली असून राज्य शासनाचे मुख्य सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाला पत्र लिहून तातडीने प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
एमफुक्टाचे उपाध्यक्ष व ‘नुटा’ चे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघवुंशी यांनी या संदर्भात सांगितले की, राज्यपाल व विद्यापीठांचे कुलपती के.शंकरनारायणन यांना एमफुक्टोने दिलेल्या मागण्यांच्या निवेदनाची दखल राजभवनने घेतली असून राज्यपालांचे उपसचिव एस.एम. साळुंके यांनी राज्य सरकारला पत्र लिहून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल महासंघाने केलेल्या तक्रारीबाबत योग्य कार्यवाही करण्यास सांगितले आहे. एमफुक्टोच्या महासचिव डॉ. तापती मुख्योपाध्याय यांना राजभवनने याच संदर्भात पत्र लिहिले असून राज्य सरकार राजभवनच्या आदेशाचे केव्हा पालन करते, याची प्रतिक्षा प्राध्यापक महासंघाला आहे. दरम्यान, प्राध्यापकांनी जाहीर केलेल्या आंदोलनाचा कार्यक्रम कायम असल्याचेही डॉ. राघुवंशी यांनी सांगितले.  
प्राध्यापकांच्या २१ जुलला मुंबईत होणाऱ्या जेलभरो आणि ४ ऑगस्टला दिल्लीत होणाऱ्या धरणे आंदोलनात प्राध्यापकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन एम.फुक्टोने केले आहे. राज्य शासन बरखास्तीचे निवेदन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही देण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governor notices mfucto demands