एजाज हुसेन मुजावर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये पाच आमदारांच्या ताकदीचा वापर करून भाजपने सर्वाधिक ६२ ग्रामपंचायती काबीज केल्या आहेत. मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपचे माजी मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांना फटका बसला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते तथा आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांना त्यांच्या माढा तालुक्यात एकही ग्रामपंचायत मिळू न देता राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी  धोबीपछाड दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने ३० ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व राखले आहे.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षानेही करमाळय़ासारख्या भागात माजी आमदार नारायण पाटील यांच्या माध्यमातून ताकद सिद्ध केली आहे. या पक्षाला १७ ग्रामपंचायती मिळाल्या, तर काँग्रेसने २१ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. उध्दव ठाकरे शिवसेना पक्षात असलेले माजी मंत्री दिलीप सोपल (बार्शी), माजी आमदार दिलीप माने (उत्तर व दक्षिण सोलापूर) आणि रश्मी बागल (करमाळा) यांनी स्वबळावर म्हणजे वैयक्तिक गटाकडून निवडणुका लढविल्या. यापैकी दिलीप माने यांचा अपवाद वगळता इतरांची निराशा झाली. या परिस्थितीत उध्दव ठाकरे शिवसेनेच्या पदरात ५ ग्रामपंचायती पडल्या. माळशिरस तालुक्यात भाजपचे नेते आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी ३५ पैकी २६ ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखले आहे.

राष्ट्रवादीला ७ तर काँग्रेसला केवळ २ ग्रामपंचायती मिळविता आल्या. अशाच पध्दतीने अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी, बार्शी तालुक्यात आमदार राजेंद्र राऊत आदींनी आपापले गड कायम ठेवले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात भाजप आणि राष्ट्रीय काँग्रेसने युती करून प्रत्येकी दोन ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. आश्चर्य म्हणजे सोलापूरला खेटून असलेल्या मार्डी येथे सरपंच निवडणुकीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा झाडे यांच्या पराभवासाठी याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांच्याच मदतीने भाजपच्या प्रांजली पवार निवडून आल्या. माजी आमदार दिलीप माने यांनी स्वबळावर उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात २१ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविताना भाजपचे नेते आमदार सुभाष देशमुख यांना मोठा शह दिल्याचे दिसून येते.

दक्षिण सोलापुरात महाविकास आघाडीचा प्रभाव दिसून आला. मंद्रूपसारख्या मोठय़ा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे नेते आप्पासाहेब कोरे यांच्या पत्नी अनिता कोरे यांनी भाजपकडून सरपंचपद खेचून आणले. शिवाय ग्रामपंचायतीवरील सत्ता पुन्हा मिळविली आहे. निंबर्गी गावातही काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे हे भाजपचे सुभाष देशमुख यांना वरचढ ठरले.  सांगोला हा शेकापचा पारंपरिक मजबूत असलेल्या गडाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पराभूत करून चार ग्रामपंचायती जिंकल्या. शेकापला अवघ्या दोन ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले, उल्लेखनीय बाब अशी की आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे  माजी आमदार दीपक साळुंखे हे धावून आले होते.सद्य:स्थितीत दीपक साळुंखे आणि आमदार शहाजीबापू पाटील यांचा दोस्ताना आणखी वाढला आहे. हा दोस्ताना दीपक साळुंखे यांना राष्ट्रवादीतून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या दिशेने घेऊन जाणार काय, याबद्दल सार्वत्रिक चर्चा आहे.

 विजयाचे दावे

भाजपचे नेते प्रशांत परिचारक यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकले नाही. भाजपचे आमदार समाधान अवताडे आणि माजी आमदार परिचारक यांच्यात यापूर्वीच बेबनाव झाला असून मंगळवेढा भागात परिचारक यांनी समविचारी आघाडीच्या माध्यमातून आमदार अवताडे यांना आव्हान दिले होते. यात १८ पैकी ९ ग्रामपंचायतींवर अवताडे गटाने दावा केला आहे, तर परिचारक यांच्या समविचारी आघाडीने ११ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. करमाळा तालुक्यातही राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार संजय शिंदे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी आमदार नारायण पाटील आणि उध्दव ठाकरे शिवसेनेत केवळ नाममात्र असलेल्या रश्मी बागल यांच्या गटांमध्ये ३० ग्रामपंचायतींसाठी जोरदार रस्सीखेच झाली. यात आमदार शिंदे गटाने १५ ग्रामपंचायतींवर तर नारायण पाटील गटाने २१ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. रश्मी बागल यांनीही ११ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. मोहोळमध्ये १० पैकी ३ जागा राष्ट्रवादीचे नेते राजन पाटील गटाने मिळविल्या आहेत, तर त्यांच्या विरोधात आव्हान दिलेल्या समविचारी आघाडीने चार ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली आहे, भाजपने दोन ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. एकदंरीत मोहोळ भागात प्रस्थापित राजन पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजल्याचे मानले जाते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grampanchayat election 2022 result tanaji sawant subhash deshmukh shocked in solapur ysh