कोयनेपेक्षा चांदोली विभागात तृणभक्ष्यी प्राण्यांचे प्रमाण कमी असल्याने सागरेश्वर अभयारण्यातून सांबर, चितळसारखे प्राणी व्याघ्र प्रकल्पात सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिणामी, वाघांना त्यांचे अन्न त्यांच्याच अधिवासात उपलब्ध होईल. त्यासाठी प्रकल्पात मोठय़ा जागेवर बंदिस्त कुरण तयार करण्यात येणार असून, येथे हरणांना सोडण्यात येणार असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वन्यजीव व वनसंरक्षक सुरेश थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. विभागीय वनअधिकारी मिलिंद पंडितराव, वन्यजीवप्रेमी रोहन भाटे उपस्थित होते.  
थोरात म्हणाले, की सह्य़ाद्री प्रकल्प कार्यक्षेत्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चौफेर नजर राहणार असून, या कॅमेऱ्यात लेपर्ट कॅट (बिबटय़ा मांजर) व ब्राऊन पाम (तपकिरी उदमांजर) कैद झाले आहेत. कास पठाराच्या धर्तीवर चांदालीतील झोळंबीचे पठारही पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. सह्णााद्री व्याघ्र प्रकल्पात प्राण्यांची संख्या वाढण्याची प्रक्रिया सुरू आहे. सांबर, चितळसारखे सागरेश्वर अभयारण्यात मोठय़ा प्रमाणात असलेले प्राणी सह्णााद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करण्यात येत आहेत. सन २०१० पासून सह्णााद्री व्याघ्र प्रकल्प सुरू झाला आहे. या प्रकल्पाचे मानांकन करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या त्रिस्तरीय समितीने गेले दोन दिवस या प्रकल्पाची पाहणी केली आहे. त्यात श्रीकुमार, उणियाल यांचा समावेश होता. गतवेळी या व्याघ्र प्रकल्पास समाधानकारक असा शेरा मिळाला आहे. चालू वर्षी त्यापेक्षा चांगला शेरा मिळण्याची अपेक्षा आहे.